आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण ताजे असतानाच पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) परीक्षेतील गैरप्रकार रविवारी उघडकीस आणला. या प्रकरणी कंत्राटदार कंपनीच्या संचालकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. परिणामी, म्हाडाने सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. त्याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे.
“या सर्व गोष्टी जनता गांभीर्याने घेत नाही. त्या वेळेपुरते चिडायचे, रागावायचे आणि निवडणुकांना मतदान भलत्याच विषयांवर केले जाते. निवडणुकांच्यावेळी सगळ्याच गोष्टी विसरल्या जातात. नको त्या विषयांवर मतदान करणार असाल तर तुमचा राग कधी व्यक्त करणार? या लोकांना शिक्षा होईपर्यंत हे सुधारणार नाहीत. कारण यांना माहित आहे लोक दोन दिवसात विसरुण जाणार. त्यामुळे परिस्थिती सुधारत नाही. लोकांनी पाच वर्षात जो त्रास सहन केलेला असतो तो ते विसरून जातात. आपल्या देशात लोकसभेची निवडणूक कांद्याच्या भावावर होत असेल तर काही होऊ शकते,” असे राज ठाकरे यांनी म्हटले.
“लोकांवर अरेरावी करण्यासाठी राज्य दिलेलं नाही ” ; राज ठाकरेंचा अनिल परबांवर निशाणा!
म्हाडातील विविध पदांच्या ५६५ रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया काही महिन्यांपासून सुरू आहे. या भरती परीक्षेसाठी म्हाडाने जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस कंपनीची निवड केली होती. त्यानुसार रविवारी १२ डिसेंबर, १५ डिसेंबर, १९ डिसेंबर आणि २० डिसेंबरला म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळांतील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार होती. १४ पदांच्या ५६५ जागांसाठी जवळपास पावणेतीन लाख अर्ज आले होते. मात्र परीक्षेसाठी दोन-तीन दिवस असताना परीक्षार्थींकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, राज ठाकरे यांनी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या आणि कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे पत्रकारपरिषदेत बोलताना अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला.
“एसटीचा विषय नीट आपण पाहणं आवश्यक आहे. मला माहिती जी मिळाली आहे, त्याप्रमाणे चुकीची असं मला वाटत नाही. या सगळ्यामध्ये एसटी कर्मचारी सर्व संघटना बाजूला करून एकत्र आले आहेत. तुमच्या हातात जे राज्य दिलेलं आहे ते लोकांसाठी राज्य दिलेलं आहे. लोकांवर अरेरावी करण्यासाठी राज्य दिलेलं नाही.” असं राज ठाकरे म्हणाले.