New Parliament Building Inauguration by PM Modi : दिल्लीतील नव्या संसद भवनाचे आज उद्घाटन पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन आणि लोकार्पण झाले असून या कार्यक्रमाचा भव्य सोहळा देखील अवघ्या देशातील जनतेने पाहिला. संसदेची नवी इमारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प होता, जो आज पूर्णत्वास गेला आहे. मोदींनी स्वतः या इमारतीच्या कामाचं भूमिपूजन केलं होतं आणि आज त्यांनी स्वतः या वास्तूचं उद्घाटन केलं. याला विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध झाला.
देशातील तब्बल २० विरोधी पक्षांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. बहुतांश विरोधी पक्षांची मागणी होती की, हा इमारतीचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या हस्ते व्हायला हवं. तर काही विरोधी पक्षांनी भूमिका मांडली की, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या इमातीचं उद्घाटन करायला हवं. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना साधं निमंत्रणही दिलं नव्हतं. त्यामुळे विरोधी पक्षांकडून या सोहळ्याला जोरदार विरोध होत होता. परंतु विरोधी पक्षांच्या मागणीला, त्यांच्या विरोधाला सत्ताधाऱ्यांनी जुमानलं नाही.
हे ही वाचा >> New Parliament Building Inauguration : नव्या संसद भवनाचं उद्घाटन होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशाला संबोधन, म्हणाले…
याचदरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या संसदेच्या उद्घाटनावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आज देशाच्या नवीन संसद भवनाचं लोकार्पण झालं. संसद भवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे. या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं. असो, या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं प्रतीक आहे ती लोकशाही टिकवण्यासाठी आजपर्यंत झटलेल्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन. भारतीय लोकशाही चिरायू होवो.