वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर शिंदे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होते आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?” असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे. तसेच हे लक्षणं महाराष्ट्रासाठी चांगले नाही, असेही ते म्हणाले.
काय म्हणाले राज ठाकरे?
“वेदांताचा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज ठाकरे यांनी ट्वीट करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ”फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?” असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे.
“हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं”, असेही ते म्हणाले.