Raj Thackeray on Mangesh Kudalkar Viral Video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या मतदारसंघातील प्रचारसभेत नर्तिकेचा कार्यक्रम ठेवण्यात आल्यावरून राज्यभर जोरदार टीका होत आहे. अत्यंत तंग कपडे घालून अश्लील हावभाव असलेले हे नृत्य सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच व्यासपीठावरील पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटोही स्पष्ट दिसतोय. त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी “हीच का लाडकी बहीण योजना’ असं म्हणत सरकारवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने आज त्यांच्या अधिकृत खात्यावरून एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये एक नर्तिका अत्यंत अश्लील हावभाव करत नाचत असल्याचं स्पष्ट दिसतंय. या व्हिडिओतील पोस्टरवरून हा कार्यक्रम कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांचा असल्याचं स्पष्ट होतंय. तर याच पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही फोटो लावण्यात आलाय. यावरून महाराष्ट्राचा युपी बिहार करून ठेवलाय, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

हेही वाचा >> Vulgar Dance In Election Campaign : मंगेश कुडाळकरांच्या प्रचारात अश्लील नाच, व्हायरल व्हिडीओवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने केला ‘हा’ आरोप

राज ठाकरे म्हणाले, “आज एक क्लिप कोणीतरी मला पाठवली. मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर एका भोजपुरी गाण्यावर बाई नाचतेय. लोकांच्या मनोरंजनाकरता बाई नाचतेय. तेही भोजपुरी गाण्यावर नाचतेय. या व्यासपीठावरील पोस्टरवर एकनाथ शिंदेंचा फोटो आणि नाव आहे. ही लाडकी बहीण योजना?”

घाणेरड्या राजकारणातून महाराष्ट्राला वाचवा

“आपण कुठे चाललो आहोत. हे असल्या प्रकारच्या मुली आणून नाचवायची युपी बिहारची पद्धत आहे. हे आपल्याकडे कधीच नव्हतं. पण आता आपल्याकडे सुरू झालं. मला असं वाटतं की यात एकनाथ शिंदेंनी वैयक्तिक लक्ष घातलं पाहिजे. म्हातारी मेल्याचं दुख नाही, पण काळ सोकावतो. या असल्या घाणेरड्या राजकारणातून महाराष्ट्र वाचवणं महत्त्वाचं आहे”, असंही राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> Raj Thackeray Speech : “शिवसेना बाळासाहेबांची प्रॉपर्टी, राष्ट्रवादी शरद पवारांचं अपत्य”, पक्षफुटीवरून राज ठाकरेंनी शिंदे-अजित पवारांना केलं लक्ष्य!

“प्रत्येक पक्षापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. कोणता पक्ष टिकला अथवा न टिकला. पण महाराष्ट्र टिकणं गरेजचं आहे. महाराष्ट्र बरबाद होता कामा नये. महाराष्ट्र बरबाद झाला तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता येणार नाही. ज्या छत्रपतींनी अख्ख राज्य उभं केलं, मान उभा केला, अटकेपार झेंडे फडकवले, असा इतिहास सांगणारा आपला महाराष्ट्र, आज व्यासपीठावर मुली नाचवतोय”, असंही राज ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray reaction on viral video of mangesh kudalkar programm at kurla sgk