Raj Thackeray : राज ठाकरे हे सुपारीबाज नेते असल्याची टीका अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. याशिवाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही राज ठाकरेंना लक्ष्य करत त्यांचे राजकारण हे मॅच फिक्सिंगचं असतं, असा टोला लगावला होता. दरम्यान, या टीकेवर आता राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना अमोल मिटकरी आणि संजय राऊत यांच्या टीकेबाबतही विचारण्यात आलं. यावर बोलताना, त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर मिळेल, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा – Raj Thackeray : “महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती करायला शरद पवारांनी हातभार लावू नये”, राज ठाकरेंची खोचक टीका!

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

मी अजून बोलायला सुरुवात केलेली नाही. ज्यावेळी मी बोलायला सुरुवात करेन, तेव्हा कोण काय बोलतं, हे कळेल. मी शांत आहे, याचं कारण मला आत्ता यांना उत्तरं द्यायची नाहीत. त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर मिळेल, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच, मी जेव्हा बोलेन तेव्हा काही गोष्टी कायमस्वरुपी त्यांच्यात लक्षात राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.

संजय राऊत-अमोल मिटकरींनी केली होती टीका

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार अमोल मिटकरी आणि खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यावर असताना अजित पवार यांना टोला लगावला होता. यावरून राज ठाकरे हे सुपारीबाज नेते असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले होते. “दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांबाबत सुपारी बहाद्दरांनी बोलू नये. कारण हे सुपारी बहाद्दर, टोल नाका असेल किंवा भोंग्यांचे आंदोलन असेल, असं कोणतेही आंदोलन यशस्वी करू शकलेले नाही. त्यांची विश्वासार्हता आता संपली आहे, असं ते म्हणाले होते.

हेही वाचा – Raj Thackeray On Yashashree Shinde Murder Case : राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीत यशश्री शिंदे हत्याप्रकरणीही चर्चा; आरोपीला फाशीची मागणी करत शक्ती कायद्यावर ठेवलं बोट!

याशिवाय संजय राऊत यांनीही आज पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांना लक्ष्य केलं होतं. राज ठाकरे यांनी राजकारणात पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे. ते दरवर्षीच नव्याने सुरुवात करतात. पण गल्ली क्रिकेटपासून ते टेस्टपर्यंत त्यांना कधीच यश मिळालं नाही. कारण त्यांचं संपूर्ण राजकारण मॅच फिक्सिंगवर चालतं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray replied to sanjay raut amol mitkari criticism solapur pc spb