मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना शरद पवारांवर सडकून टीका केली होती. शरद पवार हे महाराष्ट्रातील जातीयवादाचे जनक असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर या टीकेबाबत बोलताना मी जातीयवाद केल्याचे एक पुरावा त्यांनी द्यावां, असं आव्हानच शरद पवार यांनी राज ठाकरेंना दिलं होतं. दरम्यान, या आव्हानाला आता राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरे यांनी नुकताच टीव्ही ९ वृत्तावाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान, त्यांना शरद पवारांच्या आव्हानाबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना राज ठाकरे यांनी पुण्यातील एक प्रसंग सांगत शरद पवारांना उत्तर दिलं.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
“शरद पवार हे जातीयवाद करतात, त्याचं एक उदाहरण देतो. त्याचा व्हिडीओसुद्धा माध्यमांकडे आहे. पुण्यात एका कार्यक्रमात शरद पवारांना लोकमान्य टिळकांची पुणेरी पगडी घालण्यात आली होती. ती काढून त्यांनी ज्योतीबा फुले यांची पगडी घातली. खरं तर ती पगडी घालण्याला माझा विरोध नाही. पण यापुढे पुणेरी पगडी न वापरता फुलेंची पगडी घालत जा असं म्हणणं याला माझा विरोध आहे. हा एकप्रकारे जातीयवाद आहे. ते एक उदाहरण दाखवा म्हणाले, हेच ते उदाहरण आहे”, असं राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, शरद पवारांनी राज ठाकरेंवर बोलताना त्यांनी आयुष्यात काहीही केलं नाही, अशी टीका केली होती. “या टीकेलाही राज ठाकरेंनी उत्तर दिलं. शरद पवार यांना वयानुसार काही गोष्टी आठवत नसतील. पण अनेक ज्यागोष्टी मी केल्या त्याचं पुस्तक मी त्यांना पाठवतो. त्यानंतर त्यांना समजेल की ते कोणत्या गोष्टी विसरले आहेत”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.
“मी हे मान्य करतो, की मला एक गोष्ट नाही जमली, ती म्हणजे मी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. मागच्या बाजुने कशी पिल्लं सोडायची आणि कसं राजकारण करायचं हे उभ्या महाष्ट्राला माहिती आहे. छोट्या संघटना स्थापन करून त्यांना आर्थिक पाठबळ द्यायचं आणि त्यातून राजकारण करायचं हे राज्यातील जनतेने बघितलं आहे. त्यामुळे त्यांचं राजकारण काय आहे, हे त्यांना माहिती आहे. ते जातीयवाद करतात, याची अनेक उदाहरणं देता येतील”, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.