महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल राज्यात एक वेगळ्याच प्रकारचे कुतुहल असते. मनसेकडे केवळ एक आमदार असला तरी राज ठाकरे यांच्या करिष्माई नेतृत्वामुळे महायुतीलाही ते हवेहवेसे वाटतात. मनसेची स्थापना होऊन आता १८ वर्ष होत आहेत. या वर्षांत मनसेने अनेक चढ-उतार पाहिले. राज ठाकरे यांच्या नेतृत्वकौशल्यावरही बरेच बोलले गेले. त्यापैकीच त्यांच्यावर नेहमीच होणारी टीका म्हणजे, ते सकाळी उशीरा उठतात. शरद पवार यांनी सर्वात आधी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर अनेकांनी त्याची री ओढली. शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तर “उठ दुपारी, घे सुपारी”, अशी टीकाच केली होती. राज ठाकरे नक्की सकाळी किती वाजता उठतात? यावर आता त्यांनी स्वतःच उत्तर दिले आहे.
बोल भिडू या युट्यूब चॅनेलला राज ठाकरे यांनी एक दीर्घ मुलाखत दिली. राजकारणापलीकडले राज ठाकरे नेमके कसे आहेत? त्यांच्या आवडी-निवडी, व्यासंग, महाराष्ट्रासंबंधी असलेली त्यांची भूमिका आणि मराठी भाषेसाठी त्यांची असलेली तळमळ या मुलाखतीमधून दिसते. मुलाखतीदरम्यान लेखक अरविंद जगताप यांनी राज ठाकरे सकाळी नेमके किती वाजता उठतात? हा प्रश्न विचारला. महाराष्ट्राला त्यांच्या सकाळी उठण्याबद्दलचा गैरसमज का झाला असावा? असेही विचारले.
राज ठाकरेंचं चित्रपट प्रेम आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘शक्ती’ सिनेमातील प्रसंगाचा ‘तो’ किस्सा
राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे म्हणाले, “माझ्याबाबत गैरसमज असलेले बरे. माझी दिनचर्या सांगायची झाल्यास मी सकाळी ५ वाजता उठतो. मी ६ वाजता टेनिस खेळायला जातो. गेले काही दिवस टेनिस कोर्टची दुरूस्ती सुरूये म्हणून ते बंद आहे. दुरुस्तीनंतर पुन्हा सुरू होईल. सकळी ८ किंवा ८.३० वाजता माझी ओपीडी सुरू होते. (लोक त्यांचे प्रश्न घेऊन येतात, त्याला राज ठाकरेंनी ओपीडी हे नाव दिले) मी उशीरा उठलो, असे कधी झाले नाही.”
“माझ्या पक्षाचं चिन्ह न्यायालयातून…”, राज ठाकरेंचा शिंदे गटाला टोला; शिवसेनेच्या ऑफरबाबत म्हणाले…
पण झोपही महत्त्वाची, किमान ८ तास तरी झोपा
सकाळची दिनचर्या सांगताना राज ठाकरे यांनी झोपेबाबतचेही महत्त्व सांगितले. “मी माझ्या महाविद्यालीयन दिवसांपासून झोपेबाबत काळजी घेत आलो आहे. किमान आठ तास तरी झोपले पाहीजे. नाहीतर माणूस आजारी पडेल. दिवसभर ग्लानी येण्यापेक्षा झोप घेतलेली बरी”, असे सांगताना राज ठाकरे यांनी पाश्चात्य देशातील झोपेला महत्त्व देणारी काही उदाहरणे सांगितली.
याच मुलाखतीमध्ये राज ठाकरेंना त्यांच्या राजकीय भूमिकांबद्दल आणि मनसेच्या भवितव्याबद्दलही विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी आपली सडेतोड भूमिका विशद केली. लोकसभा निवडणुकीत एक मतदारसंघ वाट्याला येत होता, पण इंजिनशिवाय दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढणार नाही, असे आपण स्पष्ट सांगितले असल्याचे ते म्हणाले. तसेच २०१९ साली मोदींच्या विरोधात भूमिका आणि आताच त्यांना पाठिंबा का दिला? यावरही त्यांनी भाष्य केले. २०१९ रोजी नोटबंदी आणि इतर कारणांमुळे जनभावना त्यांच्याविरोधात होती. मात्र दुसऱ्या टर्ममध्ये कलम ३७० रद्द करणे, राम मंदिर बांधणे अशी अनेक चांगली कामे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली असल्याचेही राज ठाकरे म्हणाले.