Raj Thackeray : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी राजकारणातला खालावलेला भाषेचा स्तर यावर जोरदार प्रहार केला. राजकारणात जी अनेकांच्या भाषेचा स्तर खालावला आहे. तरुण पिढीला वाटतं हेच राजकारण यामध्ये आता साहित्यिकांनी लक्ष घातलं पाहिजे असं परखड मत राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) व्यक्त केलं.

राज ठाकरे काय म्हणाले?

“आम्हाला साहित्य संमेलन किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये ऐकायला बोलवावं, बोलायला बोलवू नये. महाराष्ट्रातले कवी, साहित्यिक यांच्यात मराठी बाणा रुजलेला असायचा. बिघडलेल्या राजकारण्यांना ठणकावून सांगण्याची जी हिंमत, धमक काही वर्षांपूर्वी होती ती आज मला कमी दिसते आहे. महाराष्ट्राचा जो काही खेळ झाला आहे, जी काही सर्कस झाली आहे. कुणी विदुषकी चाळे करतंय, कुणी जाळ्यांवरुन उड्या मारतंय कित्येक लोक असे आहेत ज्यांना जाळ्या नसलेल्या इमारतींवरुन उड्या मारायला लावल्या पाहिजेत.” असा टोला राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) लगावला.

हे पण वाचा- Raj Thackeray in Pune : “महाराष्ट्रात असे लोक आहेत, ज्यांना जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत”, राज ठाकरेंचा टोला

महाराष्ट्राच्या राजकारणातील भाषेचा स्तर..

महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या प्रकारची भाषा वापरली जाते आणि ज्या प्रकारच्या गोष्टी होत आहेत तिथे त्या राजकारण्यांना कान धरुन जमिनीवर आणणं आणि शिकवणं, समजावणं आणि सांगणं हे साहित्यिकांचं कर्तव्य आहे. तुम्ही ते अधिकारवाणीने सांगितलं पाहिजे. ट्रोलिंगचा वगैरे काहीही विचार तुम्ही करायचा नसतो. असाही सल्ला राज ठाकरेंनी दिला. मी जेव्हा एखादी गोष्ट बोलतो तेव्हा ती बोलून जातो, त्याचं स्पष्टीकरण देत नाही. स्पष्टीकरण देऊच नका. हीच भूमिका साहित्यिकांनी घेतली पाहिजे. असं राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले.

देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची भाषा इतक्या खालच्या थराला गेली आहे की…

आपला महाराष्ट्र देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्राची राजकीय भाषा इतक्या खालच्या थराला गेली आहे आणि इतक्या खालच्या थराला जाऊन लोक बोलत आहेत. यांना समजावणारं कुणी नाही. ज्या महाराष्ट्रातल्या लोकांना बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या आहारी गेले आहेत. साहित्य संमेलनं होत राहतील. मात्र अशा प्रकारची सामाजिक चळवळ साहित्यिकांनी उभी केली पाहिजे. ज्या प्रकारची भाषा राजकारणात येत चालली आहे, भविष्यातली जी लहान मुलं आहेत त्यांना वाटतं आहे की हेच राजकारण. ही भाषा म्हणजे त्यांना राजकारण वाटतं आहे. आत्ता काय झालं आहे की सगळे चॅनलवाले हे महाराष्ट्राच्या अधःपतनाला जबाबदार आहेत. कारण जे लोक वाट्टेल ते बोलतात ते हे लोक दाखवतात. हे लोक जेव्हा दाखवायचं बंद करतील त्या दिवशी हे सगळं बंद होईल. त्यामुळे मला वाटतं की अशा राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचं काम साहित्यिकांनी केलं पाहिजे. असं परखड मत राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) व्यक्त केलं.