शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिंदे गटामध्ये एकूण ४० आमदार सामील झाले आहेत. या बंडानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. तर दुसरीकडे राज्यात शिंदे सरकार स्थापन झालेले असले तरी, हे सरकार कायद्याच्या कसोटीवर टिकणार का? असे विचारले जात आहे. सरकार शाबूत ठेवायचे असेल तर शिंदे गटाला कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावे लागेल, असा दावा करण्यात येत आहे. असे असताना शिंदे गटाने मनसे पक्षात विलीन व्हायचा प्रस्ताव दिला तर आम्ही विचार करु, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे. झी २४ तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखातीत त्यांनी वरील भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> राज ठाकरे शिवसेना पक्षातून का बाहेर पडले? थेट उत्तर देत म्हणाले “कुंटुबातीलच लोक…”

“हे (शिवसेनेतील बंडखोर आमदार) माझे जुने सहकारी आहेत. याआधी त्यांनी माझ्यासोबत काम केलेले आहे. मला याबद्दल तांत्रिक माहिती नाही. पण उद्या त्यांच्याकडून असा प्रस्ताव आला तर मी नक्की विचार करेन,” असे राज ठाकरे म्हणाले. तसेच माझ्यासाठी सर्वप्रथम माझा महाराष्ट्र सैनिक असेल. बाकी सगळे नंतर येतील, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> “…म्हणून पहिल्या दिवसापासून मनाशी खूणगाठ बांधली,” देवेंद्र फडणवीसांनी सांगितले सत्तापरिवर्तनामागचे नेमके कारण

तसेच, शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय आणि शिवसेनेचे नेतृत्व यावरही राज ठाकरे यांनी भाष्य केले. “मी बाळासाहेब ठाकरेंना पत्रंही लिहिली होती. मी फक्त एकच गोष्ट विचारत होतो की माझा जॉब काय आहे? इतरावंर आपण सर्व जबाबदारी देणार आणि निवडणुकीसाठी मला भाषणासाठी बाहेर काढणार. दुसऱ्यांच्या जीवावर मी माझा शब्द टाकत बसायचा हे शक्य नव्हतं. शिवसेना पक्षप्रमुखपदाचा निर्णय बाळासाहेब ठाकरेंचा होता. महाबळेश्वरला असताना मी सांगितलं की मला तुमच्या मनात (बाळासाहेब ठाकरे) काय आहे, हे माहिती आहे. उद्धव ठाकरेंना तुम्ही अध्यक्ष करा. पण जाहीर मला करु द्या. कारण मग राज की उद्धव हा विषय बंद होईल. त्याप्रमाणे मी विषय बंद केला. पश्चात्ताप करण्याचा विषय नव्हता.” असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray said will think accept proposal of shivsena rebel mla to join mns prd