Raj Thackeray on caste based politics : “महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जातीपातीचं राजकारण चालू आहे, असा महाराष्ट्र मी यापूर्वी कधीही पाहिला नव्हता”, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर टीका केली आहे. राज ठाकरे हे बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, “जातीपातीचं राजकारण टोकाला पोहोचलं आहे. असा महाराष्ट्र तुम्ही यापूर्वी कधी पाहिला होता का? तुम्ही सर्व पत्रकार मंडळी अनेक वर्षांपासून मराठवाड्यात काम करत आहात, तुम्ही तरी कधी असा महाराष्ट्र पाहिला होता का? मला कधीकधी वाटतं की सर्वांनीच स्वतःला विचारायला हवं की आपण व आपलं राज्य कधी असं होतं का?”

राज ठाकरे म्हणाले, काही लोकांनी महापुरुष जाती-जातींमध्ये वाटून टाकले आहेत. संतांची आडनावं बाहेर काढली जात आहेत. त्यामागून जे काही राजकारण करायचंय, जे राजकीय उद्योग करायचे आहेत ते चालू आहेत. या सगळ्याची मला किव येते. पत्रकारही आता बदलले आहेत. सर्व पक्षांनी जातींची समीकरणं बनवली आहेत आणि स्वतःच्या फायद्यासाठी ही सगळी मंडळी अतिशय तीव्रपणे लोकांच्या मनात विष कालवत आहेत.

राज ठाकरेंकडून अजित पवारांचं कौतुक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सातत्याने ज्येष्ठ नेते शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष) व उद्धव ठाकरे (शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख) यांच्यावर टीका करत आहेत. तसेच जातीपातीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली असा आरोप राज ठाकरे यांनी आतापर्यंत अनेक वेळा केला आहे. त्यावरून राज ठाकरे यांना प्रश्न विचारला की तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल फार बोलत नाही. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “मी अजित पवारांबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो ते पूर्वी शरद पवारांबरोबर होते, पवारांचं जातीचं राजकारण चालू होतं… जेम्स लेन वगैरे प्रकरण चालू होतं… मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो की अजित पवार हे कधी जातीच्या राजकारणात पडले नाहीत आणि ही गोष्ट निश्चित आहे.”

हे ही वाचा >> “मविआच्या काळात फडणवीसांनाच नाही, तर एकनाथ शिंदेंनाही अटक करण्याचा प्रयत्न झाला”, परमबीर सिंह यांचा मोठा दावा!

राज ठाकरे म्हणाले, माझे अजित पवारांबरोबर अनेक मतभेद आहेत. इतरांचेही असतील. परंतु, जी गोष्ट योग्य आहे ती योग्य आहे. मी ठामपणे सांगतो की अजित पवार कधी जातीच्या राजकारणात पडले नाहीत. जातीच्या बाबतीत कधी त्यांचं एखादं वक्तव्य मी ऐकलं नाही. ते या भानगडीत कधी पडले नाहीत.