२७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मराठी भाषेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, तरीदेखील मराठी भाषा आणि मराठी व्यक्तीची पीछेहाट होत असून इतर भाषांच्या हस्तक्षेपामुळे मराठी भाषा मृतवत होत असल्याचं नेहमीच बोललं जात आहे. यासंदर्भात आता मराठी भाषेचा कायम आग्रह धरणाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मराठी भाषेची आणि मराठी लोकांची परिस्थिती यावर भाष्य केलं आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
“आपली परंपरा पुढे न्यायला कमी पडलो”
आपण आपली परंपरा पुढे न्यायला की पडल्याचं राज ठाकरे यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी जावेद अख्तर यांचा एक किस्सा देखील सांगितला. “आपण आपला डीएनए विसरलोय. महाराष्ट्रात लता मंगेशकर, आशा भोसले, दर्जेदार संगीतकार निर्माण होतात. जावेद अख्तर सांगत होते की आम्ही उत्तर प्रदेशातून आलो, आम्हाला आमच्याकडचं साहित्य ग्रेट वाटायचं. मुंबईत आल्यावर एका मित्रानं मराठी नाटकाला नेलं. ते नाटक होतं शांतता कोर्ट चालू आहे. ते म्हणाले मी ते नाटक पाहून कोलॅप्स झालो. या प्रकारचं नाटक इथे असेल, तर आम्ही आजपर्यंत काय करत होतो? सर्व बाबतीत महाराष्ट्र पुढे आहे. अशा गोष्टी आम्ही कधी पाहिल्याच नव्हत्या. ही परंपरा पुढे नेताना आपण कमी पडतोय”, असं राज ठाकरे म्हणाले.
“आपल्या मंत्रालयात लिफ्टमध्ये…”
दरम्यान, यावेळी बोलताना राज ठाकरेंनी पश्चिम बंगालमध्ये मंत्रालयात घडलेल्या एका घटनेची आठवण देखील सांगितली. “बंगालमध्ये तिथल्या मंत्रालयात लिफ्टमध्ये बंगाली भाषेतली किशोर कुमार यांची गाणी मला ऐकू आली. आपल्या मंत्रालयात लता मंगेशकर, आशा भोसले, भीमसेन जोशींची गाणी का नाही लागत? राजकारण्यांनी संस्कार करायचा असतो. येणाऱ्या-जाणाऱ्या माणसाच्या कानावर मराठी पडली पाहिजे. हा संस्कार केला तर त्या गोष्टी टिकतात, नाहीतर टिकू शकत नाहीत”, असं ते म्हणाले.
“व्यापार करणं हा गुजराती माणसाचा डीएनए आहे. आपल्याकडचा मुलगा क्रिकेट, चित्रपट, गाण्यात झोकून देतो. आपण आपला डीएनए ओळखला पाहिजे. नुसतंच व्यावसायिक बनू म्हटल्याने होत नाही. तुमची मानसिकता तशी असायला हवी. काहींमध्ये असते, काहींमध्ये नसते. गुजराती माणूस मुलाला सांगणार नाही की साहित्यिक हो. आपल्याकडे मुलानं कविता, लेख लिहिले तर आई-वडील कौतुकाने ते सांगतात. हा आपला डीएनए आहे”, असं देखील राज ठाकरेंनी नमूद केलं.