Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार करत असून माझ्या हातात सत्ता द्या, असे वारंवार सांगत आहेत. यावेळी अधिक आमदार निवडून आणण्याचा चंग त्यांनी बांधला असून तिकीट वाटप करताना विचार करून उमेदवार दिले आहेत. तसेच आपला मुलगा अमित ठाकरे यालाही माहीम विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. मात्र लोकसभेला मदत करूनही शिवसेना (शिंदे) पक्षाने माहीममध्ये विद्यमान उमेदवार सदा सरवणकर यांना पुन्हा तिकीट देऊन अमित ठाकरे यांच्यासाठी अडचण निर्माण केली. यामुळे मनसे आणि शिवसेना शिंदे यांच्यात गेल्या काही काळापासून तणाव सुरू आहे. आज एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना राज ठाकरेंनी शिंदेंचे कौतुक केले, तसेच मी इतर राजकारण्यांप्रमाणे नाही, असेही सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मला इतरांप्रमाणे समजू नका

टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणाच्या घसरलेल्या स्तरावर टीका केली. राजकारणाची भाषा बिघडली असल्याचे ते म्हणाले. तसेच त्यांनी आपल्या विरोधकांच्या चांगल्या बाबींचेही कौतुक केले. हे सांगताना राज ठाकरे म्हणाले की, मला तुम्ही सामान्य राजकारणी समजू नका, मी इतर राजकारण्यांप्रमाणे नाही. यासाठी तुम्ही मा राजकारणी नाही, असे समजले तरी चालेल.

हे वाचा >> Devendra Fadnavis: मुंबईत स्वत:चं घर नसलेला मी एकमेव मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस

मला इतरांच्या तराजूत तोलू नका

लाडकी बहीण योजनेवरही राज ठाकरे यांनी परखड भाष्य केले. ते म्हणाले, जर लाडकी बहीणसारखी योजना सरकारने यापुढेही टिकवली तर त्याला मी भेट म्हणेल. पण जर ही योजना पुढे टिकवता नाही आली, तर मी त्याला लाच म्हणेन. माझे राजकारणातील विचार वेगळे आहेत. मी चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणतो. प्रत्येक व्यक्तीनेच याचे अनुकरण केले पाहीजे. कोणतीही गोष्ट करताना स्वार्थ न ठेवता काम केले पाहीजे. इतर राजकारण्यांच्या तराजूमध्ये मला तोलू नका, असेही आवाहन राज ठाकरे यांनी माध्यमांना केले.

एकनाथ शिंदे दानशूर माणूस

माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे सदा सरवणकर समोरासमोर आल्यामुळे मनसे आणि शिवसेना (शिंदे) गटात तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. अशातच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दानशूर असल्याचे म्हटले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पटापट निर्णय घेतात. तसेच पुण्यात पूर आलेला असताना दोन मुले दगावली. या दोन्ही मुलांच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदे यांनी दहा-दहा लाखांचा धनादेश दिला. शिंदे यांच्या काही गोष्टी चांगल्या आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray says i am not general politician like others on maharashtra assembly elections 2024 kvg