महाराष्ट्रातील जमिनी मोठ्या प्रमाणात बळकावल्या जात आहेत. त्यामुळे मराठी माणसाच्या हातात काहीही शिल्लक राहणार नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिला आहे. रायगड जिल्ह्यात शिवडी न्हावा-शेवा पूल होत आहे. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, जेव्हा जेव्हा असे मोठे रस्ते झाले, तेव्हा तेव्हा मराठी माणसाच्या हातातून जमिनी गेल्या आहेत. कारण आपण बेसावध आहोत. तुटपुंज्या पैशांसाठी आपण जमिनी विकून टाकतो. उद्या रायगड जिल्हा मराठी माणसाच्या हातात राहणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

१०० व्या नाट्यसंमेलनात दीपक कारंजीकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे म्हणाले, या महाराष्ट्राने नेहमीच देशाचं प्रबोधन केलं आहे. ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक होऊन गेले, त्यांचा महाराष्ट्र आज चाचपडतोय ही धोक्याची घंटा आहे. महाराष्ट्र जातीपातींमध्ये अडकू लागला आहे. मराठा विरुद्ध ओबीसी, तसेच इतर जातींमध्ये संघर्ष घडवला जात आहे. हे सगळं कोणीतरी घडवून आणतंय, हे आपल्याला समजत नाही. महाराष्ट्र एकसंघ राहू नये यासाठी काही शक्ती काम करत आहेत आणि आम्ही गाफील आहोत. काही माध्यमं, समाजमाध्यमं, नेते आणि पक्ष महाराष्ट्राविरोधात काम करत आहेत. तर काही नेते सत्तेत मशगूल आहेत.

हे ही वाचा >> “…म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार नाही”, नाट्यसंमेलनात राज ठाकरेंकडून ‘त्या’ कलाकारांची कानउघडणी

मनसे अध्यक्ष म्हणाले, आपण ज्याला इतिहास म्हणतो, तो पूर्णपणे भूगोलावर अवलंबून आहे. भूगोल म्हणजे जमीन. तुमची जमीन ताब्यात घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. मुघलांनी, चंगेज खानाने, इंग्रंजांनी तेच केलं. दोन्ही महायुद्धं ही जमिनीसाठीच झाली. शिवाजी महाराजांनी तहात मुघलांना २८ किल्ले दिले होते. किल्ले का दिले? जमिनीसाठी. भूगोल काबीज करण्यासाठी ज्या लढाया झाल्या त्याला आपण इतिहास म्हणतो. आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे. महाराष्ट्राची जमीन पूर्वी युद्ध करून घेतली जात होती. आता तुम्हाला कळतही नाही इतक्या चालाखीने विकत घेतली जातेय. शिवडी-न्हावाशेवा पूल होतोय. या पुलामुळे रायगड जिल्हा सर्वात आधी बरबाद होणार. कारण आमचं लक्षच नाही. बाहेरचे लोक येत आहेत, आपल्या जमिनी विकत घेत आहेत. त्यापाठोपाठ आता आपला रायगडमधला माणूस तिथला नोकर बनून तिथे राहील किंवा त्याला रायगड जिल्हा सोडावा लागेल.

Story img Loader