बारसूमधील रिफायनरीवरून राज्यतलं राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी हा प्रकल्प लावून धरत आहेत. तर विरोधक या प्रकल्पाला विरोध करत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेगळी आणि महत्त्वाची भूमिका मांडली आहे. राज ठाकरे म्हणाले, बारसूत असा प्रकल्प उभारता येणार नाही. यासाठी राज ठाकरे यांनी युनेस्को या जागतिक वारसा स्थळांचं संवर्धन करणाऱ्या संस्थेचा दाखला दिला.
राज ठाकरे म्हणाले, बारसूमध्ये कातळशिल्प सापडली आहेत. युनेस्को नावाची एक मोठी संस्था आहे, या संस्थेचे जगभरातल्या १९२ देशांबरोबर करार आहेत. यात भारताचा देखील समावेश आहे. भारताने देखील त्यांच्याबरोबर करार केलेला आहे. युनेस्को अंतर्गत येणाऱ्या अंजिठा, वेरुळची लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स अशा अनेक वास्तू आहेत, या वास्तू युनेस्कोच्या अखत्यारित येतात. ही संस्था ठरवते की, या वास्तूंच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारची विकासकामं होणार की नाही. जिथे या प्रकारच्या हजारो वर्ष जुन्या वास्तू असतात, त्याच्या आजू-बाजूला तुम्हाला विकासकामं करता येत नाहीत. तरीदेखील आपल्याकडे लोक या आसपासच्या जमिनी विकून बसले आहेत.
राज ठाकरे म्हणाले, आपल्या लोकांना युनेस्को काय हेच माहिती नाही. एकदा युनेस्कोने सांगितल्यावर केंद्र सरकारला ती गोष्ट करावीच लागेल. बारसूमध्ये जी कातळ शिल्पं आहेत, त्याला बफर एरिया म्हटलं जातं. तो काही किलोमीटरचा असतो. त्या भागात तुम्हाला कोणत्याही प्रकारची विकासकामं करता येत नाहीत. एखाद्या ठिकाणी असा जर काही भाग असेल तर त्याच्या ३ किलोमीटरच्या परिसरात काहीही करता येत नाही, कारण ती गोष्ट पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. त्यानुसार तो भाग केंद्र आणि राज्य सरकारला विकसित करावा लागतो.
मनसे अध्यक्ष म्हणाले, बारसूतल्या दुर्मिळ गोष्टींचे फोटो मी मुद्दाम तुमच्यासाठी आणले आहेत. हे सर्व किती लाख वर्षे जुनं आहे याचा अभ्यास सुरु आहे. म्हणून त्याच्या पहिल्या यादीत बारसूचं नाव आहे. या नकाशात खालच्या बाजूला जे दिसतंय तो नाणारचा भाग आहे. त्यातून नाणार वगळलं आहे. या जमिनीवरुन घरं आणि इतर गोष्टी या मोकळी करण्यात आल्या आहेत, ही त्याच्यासाठी मोकळी केलेली जागा आहे.
राज ठाकरे म्हणाले, आता हा प्रकल्प बारसूला हलवणार आहेत. यात निळा जो भाग आहो, ती सर्व कातळशिल्पं आहेत. या सर्व कातळशिल्पाच्या बाजूला काही किलोमीटर तुम्हाला विकासकामं करता येत नाहीत. तिथे तो रिफायनरी प्रकल्प येणार आहे. हे (सत्ताधारी) तुम्हाला सतत अंधारात ठेवतात. तुमच्यापर्यंत गोष्टी पोहोचू देत नाहीत, पोहोचवत नाहीत, फक्त तुमच्या जमिनी हडप करत जातात.
हे ही वाचा >> “…त्या भीतीपोटी शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला”; राज ठाकरेंचं मोठं विधान
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, हे लोक (सत्ताधारी आणि इतर लोकप्रतिनिधी) विचार करतात कधी काळी कोणती तरी गोष्ट होईल, त्यावेळी आपण या जमिनी विकू ज्या तुमच्याकडून कवडीमोल किंमतीने विकत घेतलेल्या असतात. प्रत्यक्षात तुम्हाला काहीही सांगितलं जात नाही. माझी सर्व कोकणवासियांना हात जोडून विनंती आहे, जर जमीन घ्यायला कोणी आलं, तर कृपा करुन त्याला विचारा कशासाठी आलास? ही जमीन ठेवून मी तरी काय करु अस वाटतं असेल तर ती ठेवा, तीच जमीन तुम्हाला पैसे देईल. घाईगडबडीत काहीच करु नका. जे व्यापारी लोकप्रतिनिधी ज्यांना तुम्ही निवडून दिलं, त्यांना एकदा घरी बसवा. तुमचा राग व्यक्त होऊ दे. आजवर आम्हाला विकत आलात ना, याच्यापुढे आम्ही तुम्हाला किंमत देणार नाही, असं त्यांना सांगा.