मागच्या अठरा वर्षात मी अनेक चढ-उतार पाहिले. यात अनेक उतारच जास्त होते. या उतारात माझे कार्यकर्ते माझ्याबरोबर राहिले. एक दिवस पक्षाला यश मिळलेच आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना यश मिळवून देणारच, असे राज ठाकरे यांनी सांगितले. यश मिळविण्यासाठी संयम ठेवा. मला माझ्या कडेवरती माझी मुलं खेळवायची आहेत. सध्या महाराष्ट्रात दुसऱ्याची मुलं कडेवर घेऊन फिरण्यात आनंद मिळवला जातोय. तसलं सुख मला नको. माझ्यात ताकद आहे, असे सांगून राज ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला.
पक्ष उभा करणं आणि चालवणं याला हिंमत लागते. आमच्या दहा वर्ष आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. पण तो पक्ष नव्हता तर जिंकून येणाऱ्या आमदारांची मोळी होती. महाराष्ट्रात जर खऱ्या अर्थाने कुठले पक्ष स्थापन झाले असतील तर तो पहिला जनसंघ, शिवसेना आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पक्ष आहेत. मनसे पक्षात असलेले ९० टक्के कार्यकर्ते कोणत्याही पक्षात नव्हते. सामान्य लोकांना घेऊन आम्ही पक्ष उभा केला, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
आम्ही सर्व आंदोलनं तडीस नेली
मनसेच्या विरोधात पक्ष राजकीय पक्षच नाहीत तर माध्यमातील काही मंडळी आहेत. मनसे विषयाची सुरुवात करतो आणि शेवट करत नाही, असा आरोप आमच्यावर केला गेला. पण असे एकही आंदोलन नाही, जे आम्ही अर्थवट सोडलं. माध्यमं बाकी पक्षांना असे प्रश्न विचारत नाहीत. मग आता आम्ही त्या पक्षांना प्रश्न विचारतो. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक का नाही झाले? पंतप्रधान मोदींनी येऊन फुलं वाहिली होती, त्याचं पुढं काय झालं? मनसेने जी आंदोलनं हाती घेतली, त्याचा शेवट केला.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी आंदोलन सुरू केले. उद्धव ठाकरे सरकारचे काळात माझ्या १७ हजार कार्यकर्त्यांवर केसेस टाकल्या गेल्या आणि ते लोक स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेत होते. त्या भोंग्यांचा मुस्लीम समाजालाही त्रास होतो. माझ्या हातात एकदा सरकार द्या, सगळे भोंगे एका दिवसात बंद करतो, मग बघू कुणाची हिंमत होते, परत सुरु करण्याची. माहिमच्या समुद्रातील दर्गा एका रात्रीत तोडायला लावला होता. आम्ही प्रार्थना करण्यास विरोध करत नाहीत. पण नको तिथं प्रार्थना करू नका. दर्गा पाडल्यानंतर मुस्लीम समाजाकडून प्रतिक्रिया आली नाही, कारण त्यांनाही माहीत होतं की, हे अनधिकृत बांधकाम आहे.