मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जालना या ठिकाणी जाऊन मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. मराठा आरक्षणासाठी हे आंदोलन सुरु आहे. त्याच दरम्यान मागच्या आठवड्यात आंदोलन कर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. लाठीचार्जची घटना घडल्यानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी जालना दौरा केला. त्यानंतर आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जालना दौरा केला. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर सरकारवर घणाघाती टीका केली. गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांसाठी तुमचा जीव गमावू नका असंही राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं. तसंच मराठा बांधवांनाही त्यांनी हाच सल्ला दिला.
काय म्हणाले राज ठाकरे?
सगळ्या आंदोलकांशी मी आत्ता बोलत होतो. ज्या ज्या वेळी तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या तुमच्यापर्यंत चुकीच्या पद्धतीने पोहचल्या. मोर्चे निघत होते तेव्हाही म्हटलं होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. मी आत्ता मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोललो. जातीचं, आरक्षणाचं आमीष दाखवून हे सत्तेत कधी कधी विरोधातले सत्तेत. सत्तेत आले की तुम्हाला तुडवणार, गोळ्या झाडणार. विरोधात गेले की तुमच्यावर प्रेम उफाळणार यांचं. पोलिसांना दोष देऊ नका, आदेश कुणी दिला त्यांना दोष द्या असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांसाठी तुम्ही जीव गमावू नका
छत्रपती शिवरायांच्या पुतळा उभा करायचा आहे हे सांगून मतं मागण्यात आली. समुद्रात जाऊ फुलं टाकण्यात आली. २००७ किंवा २००८ ला हा विषय आला होता. तेव्हापासून मी सांगतोय छत्रपती शिवरायांचा इतका मोठा पुतळा समुद्रात शकत नाही. आपले गड आणि किल्ले सुधारले पाहिजेत हे मी सांगितलं होतं तेच खरं त्यांचं स्मारक ठरेल हे पण सांगितलं होतं. मात्र सतत हे आरक्षणाचं आणि पुतळ्यांचं राजकारण करायचं, मतं पदरात पाडून घ्यायची आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडून द्यायचं ही यांची भूमिका आहे. मी आज तुमच्यासमोर भाषण करायला आलो नाही. विनंती करायला आलो आहे. ज्या लोकांनी तुमच्यावर लाठ्या बरसवल्या त्या सर्वांना मराठवाड्यात पाऊल ठेवू देऊ नका जोपर्यंत हे माफी मागत नाहीत. या गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी जीव गमावू नका. त्यांना काही फरक पडत नाही. पण आपल्यासाठी जीव महत्त्वाचा आहे. निवडणुका येतील तेव्हा अशी काही आश्वासनं दिली जातील मात्र तेव्हा हे काठीचे वळ विसरु नका असंही राज ठाकरे म्हणाले.
मी राजकारण करायला आलेलो नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले घडल्या प्रकाराचं कुणी राजकारण करु नये. अरे वा! तुम्ही विरोधी पक्षात असतात तर तुम्ही काय केलं असतंत? मी आज राजकारण करायला या ठिकाणी आलेलो नाही. पण जी दृश्यं मी पाहिली, ज्या प्रकारे माता-भगिनींवर लाठ्या चालवल्या गेल्या ते बघवलं नाही म्हणून मी जालन्यात आलो. मी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यातून काय मार्ग काढता येतो ते पाहतो. मी खोटी आश्वासनं देत नाही, मला खोटं बोलायला, आमिषं द्यायला आवडत नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.