राजकारण दिवसेंदिवस गलिच्छ होत चाललं आहे. राजकीय नेते कसे रंग बदलतात ते जनतेने पाहिलं पाहिजे असं म्हणत राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर आपल्या खास शैलीत टीका केली आहे. एवढंच नाही तर जनता शांत आहे आणि हम करे सो कायदा अशी स्थिती आहे म्हणून या गोष्टी घडत आहेत असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे राज ठाकरेंनी?
जे काही राजकारण सध्या राज्यात सुरु आहे ते भयंकर आहे. पुढे बघा आणखी किती ते गलिच्छ होतं. हम करे सो कायदा अशी स्थिती आहे. अजूनही निवडणुका लागत नाही. कुणीही काही बोलत नाही, काहीही करत नाही. मोबाइल फोन नावाचं जे माध्यम आलं आहे ना त्यावर लोक व्यक्त होतात आणि शांत बसतात. पूर्वी लोक रस्त्यावर उतरायचे अन्यायाच्या विरोधात आवाज उठवायचे. आत्ता तसं घडत नाही. मोबाईलवर लोक व्यक्त होतात आणि शांत बसतात. हे मोबाईलवरचे मेसेज राजकारणी बघत नाहीत. सरकार बघतं तेव्हा लोक शांत असतात कारण त्यांचा राग व्यक्त करुन झालेला असतो. जोपर्यंत लोक रस्त्यावर उतरत नाहीत तोपर्यंत हे वठणीवर येणार नाहीत असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- “…तर राजकारणासाठी मी नालायक”, राज ठाकरेंचं वक्तव्य
तुम्ही कुणाबरोबर युती करणार का?
राजकारणात जे काही चाललं आहे ते पाहता मी कुणाबरोबर जाईन असं मला वाटत नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. रत्नागिरीतल्या दापोलीत राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर तुम्ही आणि उद्धव ठाकरेंबरोबर जाणार का असा प्रश्नही राज ठाकरेना विचारण्यात आला. त्यावर मी १० ते १५ दिवसात मेळावा घेणार आहे त्यामध्ये मी आपली भूमिका मांडणार आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- “कुणाशी युती नको, कुणाशी भानगडी नको”, कोकणात राज ठाकरेंकडून स्वबळाचा नारा
राज ठाकरे म्हणाले, “या राजकीय घडमोडींच्या पार्श्वभूमीवर हा कोकण दौरा नियोजित केलेला नाही. त्याआधीच हा कोकण दौरा ठरला होता. पक्षसंघटनेत काही बदल करायचे होते. ते बदल झाले. या बैठकांतून आता कामाला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.”
“निवडणुकीच्या आधी कोणाबरोबर युती करतात, मग निकाल लागल्यानंतर कोणाबरोबर जाता? मतदारांची अशी प्रतारणा माझ्याकडून होणार नाही. सगळे असंच करायला लागले तर महाराष्ट्राला भवितव्यच उरणार नाही. असं व्यभिचारी राजकारण मी करणार नाही. मला जमत नाही. याला राजकारण म्हणत असतील तर मी त्या राजकारणासाठी नालायक आहे”, असंही राज ठाकरे म्हणाले.