महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १७ वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाण्यातल्या गडकरी रंगायतन येथे मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी पक्षाचा आजवरचा प्रवास, राज्यातली पक्षाची कामगिरी, पक्षाची ब्लू प्रिंट यासह इतर पक्षांवर आणि राज्यातल्या राजकारणावर भाष्य केलं.
मनसेने आजवर केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा मांडताना राज ठाकरे म्हणाले की, भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरू असताना, दहशतवादी कारवाया सुरू असताना आपल्या देशात पाकिस्तानी कलाकार काम करत होते. मनसेने ४८ तासांच्या आत पाकिस्तानी कलाकारांना इथून हुसकावून लावलं. मनसे हे करत असताना सो कॉल्ड हिंदुत्ववादी पक्ष म्हणजेच स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे पक्ष कुठे होते, काय करत होते? असा सवाल करत राज यांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला टोला लगावला आहे.
राज म्हणाले की, मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठीचं आंदोलन देखील आम्ही केलं. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे पक्ष नेमकं काय करतात. यांचं हिंदुत्व काय असतं, कसं असतं. की नुसती जपमाळ हेच यांचं हिंदुत्व? प्रत्यक्ष कृतीत हे पक्ष कधीच दिसत नाहीत.
हे ही वाचा >> ‘फडणवीसांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला’; ‘त्या’ सवालावरून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
“मला अयोध्येत हिंदुत्ववाद्यांचाच विरोध”
राज म्हणाले की, भोंग्यांच्या प्रकरणानंतर मला अयोध्येला बोलावलं परंतु मला तिकडे हिंदुत्ववाद्यांनीच विरोध केला. मला त्यांचं आतलं राजकारण कळलं होतं. म्हणून मी तेव्हा ठरवलं आत्ता काही नको, यांना काय करायचं ते करू दे. पण ज्यांनी हे सगळं केलं त्यांचं काय झालं हे आपण पाहातच आहोत. म्हणून आमच्या वाटेला कोणी जायचं नाही. राज यांच्या बोलण्याचा रोख शिवसेनेकडे होता का असा सवाल उपस्थित झाला आहे. परंतु राज यांनी स्पष्ट केलं की, हे सर्व २२ मार्चच्या सभेत बोलायचे विषय आहेत. त्यामुळे यावर राज २२ मार्च रोजी सविस्तरपणे बोलतील.