Raj Thackeray : निवडणूक काळात राजकीय पक्षांनी पैसे वाटले तर ते नक्की घ्या, कारण ते तुमचेच पैसे आहेत. तुमच्याकडून ओरबाडलेले पैसेच तुम्हाला देत आहेत. ते पैसे नक्की घ्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करा असं आवाहन आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईतल्या मेळाव्यात केलं. तसंच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची आणि एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवली आहे.

स्वागताचे हार पाहिले की धडकी भरते

हल्ली स्वागताचे हार बघितले की धडकीच भरते की एखाद्या दिवशी अजगर घालतील गळ्यात. जेसीबीवरुनही हार घातले जातात. ड्रायव्हरने गाडी चालवायची कशी? असा मिश्किल प्रश्नही राज ठाकरेंनी विचारला. माझी राष्ट्रपतींकडे एक विनंती आहे. मला एक खून माफ करा, ज्याने मोबाइलमध्ये कॅमेरा आणला ना त्याचा मला खून करायचा आहे, असं राज ठाकरे म्हणाले. सगळ्यांना फोटो देणं शक्य होत नाही. परवा एकाने माझ्या चेहऱ्याजवळ कॅमेरा आणला मी म्हटलं नाकातले केस काढायचे आहेत का? हे थांबणार आहेत की नाही? हा एक प्रकारचा आजार आहे असं राज ठाकरे म्हणाले. या गोष्टी थांबल्या पाहिजेत असंही राज ठाकरे म्हणाले. या भाषणात राज ठाकरेंनी एक मिनिट मौन बाळगून रतन टाटांना आदरांजली वाहिली.

प्रामाणिक उद्योजक चालतात मग राजकारणी का नकोत?

रतन टाटा यांचा आणि माझा खूप चांगला स्नेह होता. त्यांच्या निधनाने मलाही खूप दुःख झालं. मी लोकांच्या प्रतिक्रिया वाचतो आहे लोक म्हणत आहेत, सरळ, साधा आणि सज्जन माणूस होता. जर लोकांना रतन टाटांसारखा सरळ, साधा आणि सज्जन माणूस उद्योजक म्हणून आवडतो तर तुम्हाला सरळ, साधा आणि सज्जन राजकारणी का नको? प्रत्येक वेळी तुम्ही गद्दारांना कसं काय निवडून देता? खासदार, आमदार फोडायचे. एकाबरोबर निवडणूक लढवायची, मग निवडून आल्यावर विचारांशी प्रतारणा करुन दुसऱ्या पक्षांबरोबर जायचं आणि सत्तेत यायचं हेच मागची पाच वर्षे चाललं आहे. नेमकं तुम्हाला आवडतंय का? सरळ, सभ्य विचार करणारा, प्रगतीचा विचार करणारा माणूस पाहिजे की फोडाफोडी करणारे हवेत ते ठरवा असंही राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राची अशी परिस्थिती कधीच झाली नव्हती

आज राज्यातल्या जनतेने योग्य निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र बरबाद होणार हे विसरु नका. अशी परिस्थिती महाराष्ट्रात कधीही नव्हती, असंही राज ठाकरे म्हणाले. काही निष्ठा वगैरे प्रकार आहे की नाही? महाराष्ट्राची अवस्था खूप वाईट झाली आहे. शनिवारी सगळी भाषणं झाली. असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली.

उद्धव ठाकरेंना जोरदार टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना म्हणाले पुष्पा

“उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत. सारखं वाघनखं, इथून अब्दाली आला, तिथून शाहिस्तेखान आला, तिकडून अफझल खान आला, अरे महाराष्ट्राबद्दल बोल.” यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुष्पा म्हणाले. राज ठाकरे पुढे म्हणाले, “त्या पुष्पाचं वेगळंच चाललं आहे. एकनाथ शिंदे मै आया है असं म्हणत दाढीवर हात फिरवतात. मी असा महाराष्ट्र कधीही पाहिलेला नाही. कुणामुळे निवडून आलात? कुणी तुम्हाला मतदान केलं? कशासाठी मतदान केलं? अशा प्रकारची विचारधारा मी महाराष्ट्रात पाहिलेली नाही. मला कळतच नाही की हे काय चाललं आहे? आत्ता राष्ट्रवादीत आहे, मग उबाठात जाईल किंवा तुतारीकडेही जाऊ शकतो तिथून आपल्याकडे येऊ शकतो असं मला एकजण म्हणाला. शेवटी आम्ही फुंकायचं का? मला कळत नाही यांच्या घरातले लोक तरी यांना कसे जाऊ देतात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात? येणाऱ्या पिढ्यांवर आपण काय संस्कार करतोय? महाराष्ट्र कुठल्या वाटेने नेत आहोत? असे प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थिती केले.