मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. आज त्यांनी ठाण्यातील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा २०१९ प्रमाणे ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत व्हिडीओ लावला. मात्र यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाही तर सुषमा अंधारे यांच्या भाषणाची क्लिप दाखविण्यात आली. या क्लिपवरून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. “उद्धव ठाकरे हे वारंवार माझे वडील चोरले असे म्हणत आहेत”, या विधानाचाही समाचार राज ठाकरे यांनी घेतला.
राज ठाकरे म्हणाले, “वडील चोरले हा निवडणुकीचा विषय असू शकतो का? फोडाफोडीचे राजकारण मला मान्य नाही. पण जे लोक आज आमचा पक्ष फोडला म्हणून बोलत आहेत, त्यांनी त्यांच्या इंडिया आघाडीतील नेत्यांकडे एकदा पाहावे. त्यांनी याआधी काय उद्योग केलेत? हे आठवा. याच उद्धव ठाकरेंनी मनसेचे सात पैकी सहा नगरसेवक खोके देऊन तोडले होते. तेव्हा तुम्हाला काही नाही वाटलं.”
“एकनाथ शिंदेंना अपमानित करायचे नव्हते, म्हणून…”, ठाणे लोकसभेवरून देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
“महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची कुणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवारांनी केली. पुलोदची स्थापना करून त्यांनी काँग्रेसला फोडले. त्यानंतर १९९१ साली शरद पवारांनी छगन भुजबळांना बाहेर काढून बाळासाहेबांची शिवसेना फोडली. तेव्हा शिवसेनेचे आमदार फोडण्याचे काम शरद पवारांनी केले. आज छगन भुजबळ याबाजूला आहेत. मी बाहेरून पाठिंबा दिला असल्यामुळे मी काहीही बोलू शकतो, असेही राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर नारायण राणे यांना घेऊन काँग्रेसने शिवसेना फोडली गेली”, अशी आठवण राज ठाकरे यांनी सांगितली.
सुषमा अंधारेंच्या जुन्या भाषणावरून टीका
यानंतर राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडीओ असं म्हणत सुषमा अंधारे यांचा जुना व्हिडीओ दाखविला. त्या व्हिडीओमध्ये सुषमा अंधारे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख ‘म्हातारा’ असा केला होता. या व्हिडीओच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. जर तुमचे वडिलांवर प्रेम असते तर बाळासाहेबांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या सुषमा अंधारेंना पक्षात घेऊन प्रवक्ते पद का दिले? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता, त्या भुजबळांबरोबर तुम्ही २०१९ साली मंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हा वडिलांना अटक करायला लावणाऱ्या व्यक्तीबरोबर मंत्रिमंडळात कसे बसलात?