Raj Thackeray Solapur PC : महाराष्ट्रात आगामी काळात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी शरद पवारांनी हातभार लावू नये, असे राज ठाकरे म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरे हे आज सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना शरद पवार यांच्या या विधानाबाबतही विचारण्यात आलं. यावर बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली.

हेही वाचा – Sharad Pawar meets CM Eknath Shinde: वर्षांवर भेटींचं सत्र; राज ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?.

“शरद पवार यांनी महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये. महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही, याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे. मात्र, त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना महाराष्ट्राचा मणिपूर झालेला हवाय की नकोय, याबाबत नेमकं काही समजत नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.

“भाजपाला पाठिंबा दिला तो केवळ लोकसभेसाठी”

यावेळी राज ठाकरे यांना लोकसभेनंतर आता विधानसभेतही भाजपाबरोबर युती होणार का? असा प्रश्नही विचारण्यात आला, यासंदर्भात बोलताना, “मी लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यावेळी मी स्पष्ट सांगिलतं होतं, की मी हा पाठिंबा केवळ नरेंद्र मोदी यांना देतो आहे. तेव्हा मी विधानसभेच्या पाठिंब्याचं कुठंही बोललो नव्हतो. त्यामुळे आता युतीचा विषय नाही”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

“सध्या माथी भडकवून राजकारण करण्याचं प्रयत्न सुरू”

पुढे बोलताना राज ठाकरे यांनी आरक्षणासह राज्यातील जातीपातीच्या राजकारणावरही भाष्य केलं. “महाराष्ट्रातील मुलांना शिक्षण आणि नोकरी मिळाली पाहिजे, यात जात येते कुठं. महाराष्ट्रात सर्वाधिक नोकऱ्या निर्माण होतात. खासगी शिक्षण संस्था आणि नोकऱ्यात आरक्षण नाही. मग किती जागांवर आरक्षण आहे. हे बघणंही गरजेचं आहे. मुळात सध्या माथी भडकवून राजकारण करण्याचं प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे. हे फक्त मतांचं राजकारण आहे. प्रत्येकाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. यातून हाताला काहीही लागणार नाही”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Ameya Khopkar on Amol Mitkari: “…तर कानाखाली आवाज निघणार”, अमेय खोपकरांचा अमोल मिटकरींना इशारा

“जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना जनतेने दूर ठेवावं”

“बाहेरच्या राज्यातील तरुण-तरुणी आपल्या राज्यात येतात आणि इथे शिक्षण-नोकऱ्या मिळवतात. या नोकऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांना मिळत नाही, याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे. आज जातीपातीचं प्रकरण शाळा महाविद्यालयांपर्यंत पोहोचलं आहे. यापूर्वी अशी परिस्थिती राज्यात कधीही नव्हती. उत्तर प्रदेशात अशा गोष्टी होतात, असं ऐकलं होतं. आता हे लोन महाराष्ट्रात पोहोचलं आहे, महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना जनतेने या निवडणुकीत दूर ठेवलं पाहिजे”, अशी प्रतिक्रियाही राज ठाकरे यांनी दिली.

“राज्यातल्या राजकारणाचा स्तर खाली आली आहे”

पुढे बोलताना त्यांनी राजकीय नेत्यांच्या भाषेवरही टीप्पणी केली. “आज राजकारणाचा स्तर खाली आली आहे. राजकीय नेते ऐकमेकांना ऐकेरी भाषत बोलत आहेत. यांची विधानं माध्यमांनी दाखवणं बंद केलं पाहिजे. सोशल मीडियामुळे यांची डोकी फिरली आहे, असं वातावरण महाराष्ट्रात कधीही नव्हतं”, असं राज ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray solapur pc allience with bjp reservation sharad pawar criticized spb