राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार अस्तित्वात आल्यापासून भाजपा आणि मनसेच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरे आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणता निर्णय घेणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती नवी समीकरणं बघायला मिळणार? यावरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरेंची पुढची पिढी अर्थात अमित ठाकरे राजकारणात सक्रीय होताना पाहायला मिळत आहेत. आत्तापर्यंत पक्षीय पातळीवर भेटीगाठींच्या माध्यमातून सक्रीय असणाऱ्या अमित ठाकरेंना आता निवडणूक लढवण्याचेही संकेत दिले आहेत. संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात भूमिका मांडली आहे.
युनिटच्या माध्यमातून तरुणाईचं संघटन!
राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये युनिटच्या माध्यमातून तरुणाईचं संघटन करण्याचा निर्धार अमित ठाकरेंनी यावेळी बोलून दाखवला. तसेच, या ‘युनिट’ची संकल्पनाही स्पष्ट करून सांगितली. “महाविद्यालयाबाहेर पक्षाची एक पाटी असेल. त्यावर मनसेच्या संबंधित युनिटमध्ये असणारे महाविद्यालयाचे आजी – माजी विद्यार्थी आणि पक्षाचे पदाधिकारी यांची नावं आणि मोबाईल नंबर दिले जातील. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण असेल, तर त्यांनी त्या नंबरवर फोन करून सांगावं. आम्ही तिथे येऊ, तो प्रश्न बघू आणि सोडवू”, असं अमित ठाकरे म्हणाले.
“राजकारणाकडे मनोरंजन म्हणून बघणं कमी करा”
यावेळी अमित ठाकरेंनी मतदारांनाही राजकारणाविषयी आवाहन केलं आहे. “मला लोक विचारायचे की मी दसरा मेळावा बघितला का? मी दसरा मेळावा नाही बघितला. कारण त्यात लोकांबद्दल, शेतकरी आत्महत्यांबद्दल ते बोलतायत का? आम्ही कशासाठी दसरा मेळावा बघायचा? राजकारणाकडे मनोरंजन म्हणून बघणं कमी करा. त्याचं मतांमध्ये रुपांतर होऊ देऊ नका. मतदान करताना जे तुमच्यासाठी काम करतात त्यांचाच विचार करा”, असं आवाहन अमित ठाकरेंनी केलं.
दरम्यान, यावेळी बोलताना अमित ठाकरेंनी आगामी काळात निवडणूक लढवण्याचेही संकेत दिले. एकीकडे २०१९च्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या रुपात ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतल्यानंतर आता त्याच पिढीतली दुसरी व्यक्ती, म्हणजेच अमित ठाकरेंनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. “मला जिथे लढवाल, जिथे आपली ताकद असेल, तिथे मी स्वत: प्रचारासाठी येईन”, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.
“..तर मी राजकारणात नसतो”
“मी राज ठाकरेंचा मुलगा नसतो, तर मी राजकारणात आलो नसतो. आत्ताची राजकीय परिस्थिती बघून मला राजकारणात यायची इच्छाच झाली नसती. राज ठाकरेंनी मला मुलगा म्हणून संधी दिली आणि मी राजकारणात आलो. तरुणांमध्ये खूप उदासीनता आली आहे” असं ते म्हणाले.