महराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांचं वाहन रोखल्यामुळे झालेल्या वादात मनसेच्या कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याची तोडफोड केल्याची घटना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अमित ठाकरे शिर्डीहून मुंबईला परत येत असताना सिन्नर तालुक्यातल्या टोलनाक्यावर त्यांचं वाहन अडवण्यात आलं. तेव्हा टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अमित ठाकरे यांच्याशी वाद घातल्याचं सांगितलं जात आहे. या वादानंतर त्याच दिवशी (२३ जुलै) रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केली. या तोडफोडीनंतर भाजपाने मनसेवर टीका सुरू केली आहे. तर मनसेनेही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कृतीचं समर्थन केलं आहे.
दरम्यान, या तोडफोडीच्या प्रकरणावर मनसे अध्यक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी सुरुवातीला कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. राज ठाकरे यांनी आज (२६ जुलै) यावर भाष्य केलं आहे. राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुण्यात मनसेच्या शाखाध्यक्ष, विभाग अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी निवडणुकीसाठी राज ठाकरे पक्षबांधणी करण्यात व्यस्त आहेत. त्यासाठी ही बैठक होती. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी टोल नाक्याच्या तोडफोडीच्या प्रकरणावर भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले, अमित सध्या महाराष्ट्रभर दौरा करतोय. तो काही टोलनाके फोडत चालला आहे असं काही नाहीये. एका टोलनाक्यावर हा प्रसंग घडला.
राज ठाकरे म्हणाले, त्या टोलनाक्यावर अमितची गाडी बराच वेळ उभी होती. त्याच्या कारवर फास्टॅगही होता. तरीदेखील त्याला थांबवून ठेवलं होतं. तो त्यांना सांगत होता की, मी टोल भरला आहे, तरी त्याला थांबवलं. मग ही फोडाफोडी झाली. त्यावेळी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याचा वॉकीटॉकी सुरू होता आणि समोरचा माणूस त्यावरून उद्धटपणे बोलत होता. त्यावर आलेली ही मनसैनिकांची प्रतिक्रिया आहे. अमित महाराष्ट्रभर टोल फोडत सुटलेला नाही.
हे ही वाचा >> “सध्याच्या सगळ्या भोंदूगिरीत या माणसाकडून…”, उद्धव ठाकरेंची अजित पवारांवर स्तुतीसुमनं
राज ठाकरे म्हणाले, भाजपाने टीका करण्यापेक्षा त्यांनी निवडणुकीआधी जी टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती, त्याचं काय झालं? ते सांगावं. हे जे टोलनाके आहेत ते म्हैस्कर नावाच्या माणसाला मिळतात, हा कोण लाडका आहे? हा कोणाचा लाडका आहे? यावरही त्यांनी बोलावं.