“आमचा राजू विधानसभेत एकटा होता. माझा आमदार विकणारा नाही तर टिकणारा होता. नाहीतर सहज माझी निशाणी घेऊन दुसरीकडे बसला असता. एकटाच तर होता. पण असल्या गोष्टी माझ्या सहकाऱ्यांना शिवत नाहीत”, असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांचं कौतुक केलं.
हेही वाचा >> “शिवसेना ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी, राष्ट्रवादी हे शरद पवारांचं अपत्य”, पक्षफुटीवरून राज ठाकरेंनी बंडखोरांना केलं लक्ष्य!
काका मला माफ करा
ते पुढे म्हणाले, “२०१९ ला निवडणुका झाल्या. २०१९ निवडणुका संपल्या, निकाल लागला. मग सकाळचा शपथविधी झाला. पंधरा मिनिटांत ते लग्न तुटलं. कारण काकांनी डोळे वटारले. मग लगेच घरी आले. काका मला माफ करा म्हणाले. मग ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या होत्या, त्यांच्याचबरोबर जाऊन बसले. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात निवडणूक लढवली होती. पण नंतर त्यांच्याबरोबर बसले”, असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवार आणि उद्धव ठाकरेंना शाब्दिक चिमटा काढला.
“अमित शाहांनी सांगितलं होतं की अडीच वर्षांचं मुख्यमंत्री पदाची हमी देतो, असं उद्धव ठाकरे त्यावेळी बोलले होते. पण कुठे झालं हे? चार भिंतीत? मी मागे म्हटलं होतं की तुमच्यासमोर नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री होतील. तेव्हा आक्षेप का नाही घेतलात?” असा सवाल त्यांनी पुन्हा एकदा विचारला.
शिवसेना ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी
“एकनाथ शिंदेंनी नाव आणि निशाणी घेतली. अजित पवारांनी नाव घेतलं, निशाणी घेतली. आता शिवसेना नाव आणि धनुष्यबाण ही ना एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे आणि नाही उद्धव ठाकरेंची. ती बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. त्याला कसे हात लावता? तुम्हाला काय ते आमदार फोडाफोडीचं राजकारण करा”, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य केलं.
ते पुढे म्हणाले, “माझे कितीही मतभेद असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे शरद पवारांचं अपत्य आहे. ते अजित पवारांचं अपत्य नाही. महाराष्ट्राची वैचारिक किती घसरण व्हावी? पक्ष पळवतात, निशाणीच्या निशाणी पळवतात. माणसं पळवली जातात”, असंही राज ठाकरे म्हणाले.