गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात राजकीय नेतेमंडळींच्या सभांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सर्वात आधी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी ५ मार्च रोजी रत्नागिरीच्या खेडमधल्या गोळीबार मैदानावर जाहीर सभा घेतली. त्यावर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी १९ मार्चला त्याच मैदानावर सभा घेतली. त्यातही त्यांनी उद्धव ठाकरेंवर परखड टीका केल्यानंतर आता आज मनसेच्या पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडेंनी यासंदर्भात टीव्ही ९ शी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरेंची सभा कशी असेल?
यावेळी राज ठाकरे आपल्या भाषणात काय बोलणार? याबाबत संदीप देशपांडेंनी सूतोवाच केले आहेत. “दरवर्षी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात एक नवीन संदेश घेऊन राज ठाकरे समोर येतात. सध्या जे गलिच्छ आणि अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण चालू आहे, त्याच्यावर तुरटी फिरवण्याचं काम राज ठाकरेंचं आजचं भाषण करेल”, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
रेकॉर्डब्रेक सभा होणार?
दरम्यान, कुणाच्या सभेला जास्त गर्दी? या मुद्द्यावर गेल्या दोन आठवड्यांत शिंदे गट, ठाकरे गट आणि भाजपा यांच्यामध्ये जोरदार दावे-प्रतिदावे झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, राज ठाकरेच त्यांच्या आधीच्या सभांचा रेकॉर्ड मोडू शकतात, असा दावा संदीप देशपांडे यांनी केला आहे. “राज ठाकरेंचं भाषण म्हणजे अणुबॉम्ब असणार आहे आणि त्याचे हादरे सगळ्यांनाच बसणार आहेत. राज ठाकरेंची सभा ही नेहमीच रेकॉर्ड ब्रेक असते. त्यांच्या आधीच्या सभांचा रेकॉर्ड हे फक्त तेच मोडू शकतात. बाकी कुणालाही त्यांच्या सभेचा रेकॉर्ड मोडणं शक्य नाही”, असा दावा संदीप देशपांडेंनी केला आहे.
मनसेच्या टीझरमधून आक्रमक भूमिकेचे सूतोवाच!
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसेकडून या सभेसंदर्भातला टीझर शेअर करण्यात आला होता. या टीझरमध्ये सभेतील राज ठाकरेंच्या भाषणाचे सूतोवाच करण्यात आले होते. यामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या एका वक्तव्याची व्हिडीओ क्लीप समाविष्ट करण्यात आली असून त्यासोबतच ‘तळपत्या ठाकरी विचारांचा वारसा जपण्यासाठी चला शिवतीर्थावर!’ असं आवाहनही करण्यात आलं आहे.
राज ठाकरेंच्या भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष, भाषणात ‘या’ मुद्द्यांवर करणार भाष्य?
या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या राजकीय टोलेबाजीची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचली आहे.