स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ जयंतीनिमित्त विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहातील बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यात सरकारच्यावतीने अनेकांची भाषणे झाले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणातून बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या निर्णयावरही भाष्य केलं आहे.
विधानभवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे म्हणाले, “मी लहानपणापासून अनेक गोष्टी बघितल्या आहे. पराभव झालेली अनेक लोक रडत बाळासाहेबांना भेटायला यायची. त्यांना सांभाळणारे बाळासाहेब, निवडून येणाऱ्या लोकांशी बोलणारे बाळासाहेब, वेगवेगळी प्रसिद्ध लोक भेटायला आल्यानंतर त्यांच्याशी बोलणारे बाळासाहेब, हे सगळं मी लहानपणापासून पाहत आलो आहे.”
“असं विलक्षण व्यक्तीमत्व मी लहानपणापासून पाहत आलो आहे. मी त्यांच्याबरोबर वावरलो, त्यांचा सहवास मला मिळाला. मी खरंच सांगतो की, मी लहानपणापासून त्यांच्याबरोबर वावरल्यामुळे… मी ज्या गोष्टी पाहू शकलो. त्यामुळेच मी स्वत:चा राजकीय पक्ष काढू शकलो, नाहीतर हिंमत झाली नसती. त्यामुळे मी यश आलं तरी हुरळून जात नाही आणि पराभव झाला तरी खचून जात नाही. बाळासाहेबांना लहानपणापासून पाहत आलो, म्हणून मला ही गोष्ट मिळाली,” अशी आठवण राज ठाकरेंनी सांगितली.