महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात एक दरारा आहे. त्यांच्या कोणत्याही भाषणाला हजारोंच्या संख्येनं लोक जमा होत असतात. नुकतंच ते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले. यावेळी भाषण करताना राज ठाकरे यांनी मुलगा अमित ठाकरे यांनी दिलेल्या सल्ल्याबाबत खुलासा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं प्रकरण काय?

खरं तर, मनसेकडून मुंबईत ‘महाराष्ट्र नवनिर्माण रील बाज पुरस्कार’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज्यभरातून अनेक मराठी रीलस्टार उपस्थित होते. या कार्यक्रमात रील स्टार्सशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी एक किस्सा सांगितला आहे. संबंधित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज ठाकरे यांना काय सल्ला दिला होता? याचा खुलासा त्यांनी स्वत: केला आहे.

मराठी रील स्टार्सना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, मी तुमच्याशी फार काही बोलणार नाही. इथे तुमचे अनेक कार्यक्रम होणार आहेत. अमितनेही (अमित ठाकरे) मला तसं सांगितलं आहे. मी अमितला विचारलं, कसला कार्यक्रम आहे. त्यावर तो मला म्हणाला की, काही नाही… तू फक्त ये, दोन मिनिटं बोल आणि निघ… मी घरच्यांच्या फारसा विरोधात जात नाही. त्यामुळे मी फार बोलणार नाही, असा किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला.

हेही वाचा- मंचावर शरद पवारांशी हातमिळवणी न करता निघून का गेलात? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

रील स्टार्सना उद्देशून राज ठाकरे पुढे म्हणाले, “आपल्यापैकी अनेकजण रील्स करणारे आहेत. काहीजण रील्स करत आहेत किंवा यापुढे करतील. तुम्ही जे करत आहात, ते किती महत्त्वाचं आणि मोलाचं आहे, याची जाणीव तुम्हाला होणं आवश्यक आहे. संपूर्ण समाजाला गुंतवून टाकण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. लेखक, गायक, संगितकार कलावंत आणि चित्रपट दिग्दर्शक अशा सर्व क्षेत्रांतील लोकांसह तुमचे या देशावर खूप मोठे ऋण आहेत. कारण तुम्ही लोक नसता तर या राज्यात कधीच अराजक झालं असतं. तुमच्यामुळे समाज वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करतो.”

हेही वाचा- पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर अजित पवारांची मणिपूर हिंसाचारावर प्रतिक्रिया, म्हणाले…

“आजची महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहता, कोण कुठे आहे? याचा काही पत्ताच लागत नाही. कोण कुठल्या पक्षात गेलाय, काहीच कळत नाही? या सर्व गोष्टींकडे केवळ तुमच्यामुळे दुर्लक्ष होतंय. आज समाज शांत बसलाय, आनंदी आहे, यामध्ये सर्वात मोठं श्रेय तुमचं आहे. मला फक्त एवढंच सांगायचंय तुमच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्रात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींबाबत तुमच्या रील्सच्या माध्यमातून प्रबोधन झालं पाहिजे. या गोष्टी तुम्ही उत्तम रितीने करू शकाल, अशी मला १०० टक्के खात्री आहे. तुम्ही महाराष्ट्रांच्या प्रश्नांकडे बारकाईने लक्ष द्यावं आणि ते तुमच्या विनोदाच्या रुपाने लोकांच्या समोर यावेत, एवढीच मला अपेक्षा आहे,” असंही राज ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray speech mns reel baaz award amit thackeray mns vidyarthi sena mumbai rmm