गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या समीकरणाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. २०१९मध्ये ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत जाहीर सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यंदा महाराष्ट्रात त्याच भारतीय जनता पक्ष व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर महायुतीत जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यासंदर्भात महायुतीमधील देवेंद्र फडणवीसांपासून अनेक नेतेमंडळींनी सकारात्मक विधानं केली आहेत. आता खुद्द राज ठाकरे यासंदर्भात काय भूमिका जाहीर करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
पाडवा मेळाव्याच्या भाषणाकडे लक्ष
आज मनसेच्या पाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करण्याची शक्यता आहे. गेल्या दोन महिन्यांत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर कार्यक्रमांमधून ‘पाडवा मेळाव्यात सविस्तर बोलेन’ असं सांगितलं आहे. त्यात यंदाच्या पाडवा मेळाव्याआधीच मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याचे दावे केले जात असताना त्यासंदर्भात राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
देवेंद्र फडणवीसांची राज ठाकरेंबाबत भूमिका
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली आहे. “मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतली तेव्हापासून आमची जवळीक वाढली. राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील अशी अपेक्षा आहे”, असं ते म्हणाले आहेत. शिवाय, राज ठाकरेंसोबत महायुतीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात चर्चेच्या फेऱ्या झाल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.
मनसेच्या टीजरमध्ये भूमिकेबाबत सूतोवाच!
दरम्यान, मनसेनं पाडवा मेळाव्याआधी व्हिडीओ टीजरच्या माध्यमातून या भाषणात नेमकं काय असेल? याबाबत संकेत दिले आहेत. यामध्ये राज ठाकरेंच्या आवाजातील एका व्हिडीओमध्ये त्यांनी नेमकं काय घडतंय हे सांगण्याची वेळ आली आहे, असं म्हटलं आहे. “गेल्या काही आठवड्यापासून आपल्या पक्षाबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. याकडे मी शांतपणे पाहत आहे. तुम्हालाही अनेकांनी प्रश्न विचारुन भंडावून सोडलं असेल. मात्र, या सगळ्यावर बोलण्याची वेळ आलीय. नक्की काय घडतेय, घडवले जातेय हे सांगण्याची वेळ आली आहे. ९ एप्रिलला शिवतीर्थावर या, आपल्याशी मला बोलायचे आहे”, असा उल्लेख त्यात आहे.