Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरेंशी हातमिळवणीबाबत भाष्य केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही राज ठाकरेंना सकारात्मक प्रतिसाद दिला. याच मुलाखतीत राज ठाकरेंनी मराठी माणसाने कसं सावध असलं पाहिजे यावर भाष्य केलं. मला मराठी माणसाला सांगायचं आहे बटेंगे तो कटेंगे असं राज ठाकरे म्हणाले. ते का हे आपण जाणून घेऊ.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

मूळ विषयांकडून लक्ष भरकटवून टाकायचं आणि तुम्हाला जातीपातींमध्ये अडकवून लढवायचं हे सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण सुरु आहे. ज्या समाजांमध्ये वाद निर्माण करतात त्यांनाही माहीत नाही हे का चाललं आहे, कशासाठी चाललं आहे? निवडणुका येतील हे मतदान करतील, मतांपोटी या गोष्टी होतील पुढे कुणीही विचारणार नाही. भोळसटपणाने मतदान होत असेल तर कुणी कशाला समस्यांवर सोल्यूशन काढेल?” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. यापुढे त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं.

मला मराठी माणसाला सांगायचं आहे बटेंगे तो कटेंगे-राज ठाकरे

राजकारण्यांमध्ये इच्छा असली तर सगळ्या गोष्टी घडू शकतात. पण तुम्हाला समाजांची डोकी भडकवून, जातीपातींमध्ये लढवून तसंच करायचं असेल तर काहीही होऊ शकणार नाही. खरंतर हे निवडणुकीत वापरलं होतं पण मला मराठी माणसाला आज सांगायचं आहे की बटेंगे तो कटेंगे. नुसतं मतदान म्हणून गोष्टी पाहू नका. प्रत्येकाने अस्तित्व ही गोष्ट जपली पाहिजे. आपण काय होतो, आपण काय आहोत हे ज्या दिवशी महाराष्ट्राला समजेल तेव्हा महाराष्ट्राचं चित्र वेगळं असेल. असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मराठी चित्रपटांबाबत काय म्हणाले राज ठाकरे?

चित्रपटांबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा राज ठाकरे म्हणाले की मराठी चित्रपट वेगळं काय देत आहेत? हिंदी भाषा उत्तर प्रदेशातही बोलली जाते. तरीही तिथे भोजपुरी चित्रपट चालतात. मराठी चित्रपटांनी कथानकांच्या बाबतीत कात टाकणं आवश्यक आहे. मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीत हा मुद्दा आला होता तेव्हा मी सांगितलं होतं की मी तुम्हाला थिएटर्स मिळवून देऊ शकतो पण प्रेक्षक मिळवून देऊ शकत नाही. मराठी चित्रपटांचा रसिक हा चोखंदळ आहे, तो जाणार चित्रपटाला. बाई पण भारी देवा सारख्या सिनेमाला लोक गेलेच ना? टीव्हीवर जे चाललं आहे ते सोडून काही देणार असाल तर मी येईन अशी भूमिका मराठी माणसाची आहे. मला इतकंच म्हणायचं आहे की अनेकदा वाटतं की लोकांनी चित्रपटांकडे पाठ वळवली. पण चित्रपटांकडेही तेवढं मटेरियल असलं पाहिजे असं मला वाटतं. महिलांना आनंद वाटला पाहिजे असे चित्रपट निर्माण झाले तर लोक येतीलच असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. वास्तव में Truth या पॉडकास्टमध्ये राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना मुलाखत दिली त्या मुलाखतीत हे भाष्य राज ठाकरेंनी केलं आहे.