Raj Thackeray MNS Sabha Updates : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर गुढीपाडवा मेळाव्यात जोरदार भाषण केलं. आपल्या भाषणात राज ठाकरेंनी राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य केलं. तसंच देवेंद्र फडणवीस यांना आम्ही पाठिंबा देऊ त्यांनी आमचं ऐकावं असं म्हणत त्यांची राजकीय भूमिकाही एक प्रकारे जाहीरच केली.

राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे काय प्रश्न निर्माण होण्याची शक्यता?

सध्या महाराष्ट्रात सगळेच पक्ष महापालिका निवडणुकांची तयारी करत आहेत. अशातच राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याची भाषा गुढीपाडवा मेळाव्यातून केली आहे. यामुळे अनेकांना मागच्या वर्षी झालेल्या गुढीपाडवा मेळाव्याची आठवण आली आहे. राज ठाकरेंनी त्यावेळी झालेल्या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आता महापालिकेत भाजपा महायुतीसह मनसेही येणार का? असा प्रश्न चर्चिला जाण्याची शक्यता आहे.

…तर देवेंद्र फडणवीस यांना आमचा पाठिंबा

“निवडणुका संपल्या, शिमगा झालेला आहे. तुमच्या साक्षीने सांगतो, देवेंद्र फडणवीसांच्या हाती एक सुसंस्कृत राज्य आलेलं आहे. याच्याकडे नीट बघा. मराठी माणसासाठी जर चांगल्या गोष्टी करणार असाल तर आमचा तुम्हाला निश्चितपणे पाठिंबा आहे. पण प्रत्येक गोष्ट आमचं ऐकून करा.” असं राज ठाकरे म्हणाले आहेत. आता हा पाठिंबा फक्त भाजपाला आहे की एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अशा महायुतीला आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याबाबत येत्या काही दिवसांत राज ठाकरे भूमिका स्पष्ट करु शकतात.

औरंगजेबाच्या कबरीबाबत राज ठाकरे काय म्हणाले?

औरंगजेबाच्या कबरीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “औरंगजेबाच्या कबरीभोवतीची सजावट काढून टाका. त्या ठिकाणी फक्त कबर दिसली पाहिजे आणि त्या ठिकाणी एक मोठा फलक लावा. आम्हा मराठ्यांना संपवायाला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला. हा आमचा इतिहास आहे. शाळेतल्या मुलांना सहलीला नेऊन त्यांना हा इतिहास दाखवा”, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

अफझल खानाची कबर बांधा हे महाराजांनीच सांगितलं असणार-राज ठाकरे

अफझल खान प्रतापगडावर आला होता. त्याला पायथ्याशीच पुरला. ‘पुरुन उरेन’ हा शब्द याच कृतीतून आला आहे. अफझल खानाची कबर महाराजांना विचारल्याशिवाय बांधली गेली? शक्यच नाही. त्यांनी सांगितलंच असणार की अफझल खानाची कबर नक्की बांधा. ज्यांना गाडलंय त्यांची प्रतीकं नेस्तनाबूत करुन चालणार नाही. जगाला दाखवलं पाहिजे आम्ही यांना गाडलं आहे. शाळकरी मुलांना सहलीला नेऊन तो इतिहास दाखवला पाहिजे. असंही राज ठाकरे म्हणाले.