राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेनंतर त्यांच्यावर विविध पक्षांच्या नेत्यांकडून झालेल्या टीकाटिपण्ण्यांवर राज यांनी आज उत्तर दिलंय. राज ठाकरे यांची भव्य सभा ठाणे येथे भरवण्यात आली आहे. या सभेत त्यांनी जोरदार टोलेबाजी करत महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर टीका केली आहे. सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे, दाखवायचे सुळे वेगळे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
गुढीपाडव्यादिवशी झालेल्या आपल्या भाषणावर झालेल्या टीकेला राज ठाकरे यांनी आजच्या ठाण्यातल्या सभेतून उत्तर दिलं. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले,”सुप्रिया सुळे म्हणतात, लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटिशीने बदलतील याचं मला आश्चर्य वाटतं. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते, पण तुमच्या घरी रेड पडत नाही याचं कारण मला कळेल का? सुप्रिया सुळेंनी बोलायचं नाही. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत”.
राज ठाकरेंबद्दल बोलताना सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?
राज ठाकरे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज यांना आलेला ईडीच्या नोटीशीचा संदर्भ देत टीका केली होती. “लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीशीमुळे एवढे बदलतील याचं मला कौतुक आणि आश्चर्य वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, त्यांनी हा आरोप याआधीही केलाय. अशा गोष्टींमध्ये इनकनस्टीस्टंटली कन्सीस्टंट आहेत,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.