भाजप सरकारच्या शपथविधी सोहळ्याला मी अनुपस्थित राहिल्याचा कोणताही चुकीचा अर्थ काढू नये, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले. नव्या सरकारपर्यंत आपल्या शुभेच्छा पोहचल्याचेही राज यांनी सांगितले. जवखेडा हत्याकांडातील पिडीत दलित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी ते आज अहमदनगर जिल्ह्यात आले होते. नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे राज ठाकरेंनी यावेळी सांगितले. यावेळी विधानसभा निवडणुकीतील पराभवाविषयी विचारले असता, पराभवासाठी पक्षाबाहेरची अनेक कारणे जबाबदार आहेत. महाराष्ट्रात मनसेला आलेल्या अपयशाचा मी सध्या आढावा घेत असून यासाठी आणखी खोलवर जाण्याची गरज आहे. त्यामुळे इतक्यात त्याविषयी बोलणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी म्हटले. राज्यातील अनेक लोकांना मला भेटायचे आहे. त्यांनी माझ्याकडे येण्यापेक्षा मी त्यांच्याकडे जाऊन  म्हणणे ऐकून घेत असल्याचे राज यांनी सांगितले. याशिवाय, देवेंद्र फडणवीस चांगली व्यक्ती असून त्यांच्याकडून राज्याला चांगल्या कारभाराची अपेक्षा असल्याचेही राज यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा