खारघर या ठिकाणी १६ एप्रिलला डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमात २० लाखांहून अधिक लोक उपस्थित होते. या कार्यक्रमात आलेल्या श्री साधकांचे उष्माघातामुळे हाल झाले. १४ लोकांचा या प्रकरणात मृत्यू झाला. यानंतर आता यावरून राजकारण रंगलं आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. त्या मागणीबाबत विचारलं असता करोना काळात हलगर्जीपणा झाला आहे असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे. आज राज ठाकरेंनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे राज ठाकरे यांनी?

“करोनाच्या काळातही अनेक प्रकारचा हलगर्जीपणा झाला आहे. तिथेही अनेक प्रकरणांमध्ये आपल्याला सदोष मनुष्यवधाचा खटला आजही दाखल करता येऊ शकतो.याचं राजकारण करायला नको. सकाळची वेळ निवडायला नको होती. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सत्कार आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना द्यायला हवा होता. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा पुरस्कार मिळाला आहे ही आनंदाची बाब आहे. मात्र जे घडलं तो अपघात आहे. अपघाताचं राजकारण कुणीही करू नये.” असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

नेमकं हे प्रकरण काय आहे?

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी ( १६ एप्रिल ) ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारींना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारमधील मंत्री उपस्थित होते. पण, या कार्यक्रमाला गालबोट लागलं. नवी मुंबईतल्या खारघर या ठिकाणी असलेल्या मैदानावर झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ कार्यक्रमाला धर्मधिकारी यांचे लाखो अनुयायी दाखल झाले होते. हा कार्यक्रम भर दुपारी ठेवण्यात आला होता. त्यावेळचं तापमान ४२ अंश सेल्सियस होते. या तापमानामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. तर अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरु होते.

मात्र या प्रकरणावरून सध्या राजकारण रंगलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेसाठी सरकारच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. काही वेळापूर्वीच खारघरमध्ये १०० हून अधिक लोकांचा बळी गेला असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसंच उद्धव ठाकरेंनी या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी केली जावी आणि दोषींना कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र पाठवून केली आहे.