Raj Thackeray : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. दिवाळीनंतर प्रचाराला जोर येणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांचा सामना रंगणार आहे. २०१९ आणि २०२४ या दोन्ही निवडणुकींमध्ये महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे या दोन्ही निवडणुकांमध्ये युती विरुद्ध आघाडी असा सामना होता आणि यामध्ये अनुक्रमे भाजपा-शिवसेना तसंच काँग्रेस राष्ट्रवादी असे पक्ष होते. आता ती परिस्थिती नाही. आता दोन पक्ष फुटले आहेत. त्यानंतर राज ठाकरेही निवडणुकीत जोमाने उतरले आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष का फुटले? याचं कारण राज ठाकरेंनी सांगितलं आहे.
उद्धव ठाकरेंचा पक्ष कधी फुटला?
२१ जून २०२२ ला एकनाथ शिंदे यांनी थेट पक्ष नेतृत्वाला आव्हान दिलं आणि सत्ताधारी शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह ४० आमदारांनी बंड पुकारलं. शिवसेनेतलं हे सर्वात मोठं बंड ठरलं. आता शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदेंकडे आहे. तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं आहे आणि त्यांचं पक्षचिन्ह मशाल आहे. एकनाथ शिंदे भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. तर त्यांच्याच नेतृत्वात महायुतीकडून निवडणूक लढवली जाते आहे.
शरद पवारांचा पक्ष कधी फुटला?
२ जुलै २०२३ ला म्हणजेच शिवसेनेतल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर अजित पवार ४१ आमदारांचा गट घेऊन सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांनी घेतलेला हा निर्णय सगळ्यांनाच चकीत करणारा होता. पक्षाचं नाव म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवारांना देण्यात आलं आहे. तर तुतारी वाजवणारा माणूस हे शरद पवारांच्या पक्षाचं चिन्ह आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे त्यांच्या पक्षाचं नाव आहे. या दोन्ही पक्षांच्या फुटीची अनेक कारणं दोन्ही नेत्यांकडून सांगितली गेली. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी आता या फुटीचं प्रमुख कारण सांगितलं आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आतून तुटलेच होते
मी जेव्हा शिवसेना सोडली त्यावेळी मी म्हटलं होतं की मी बाळासाहेब ठाकरेंबाबत हे म्हटलं होतं की त्यांनी माझ्यावर काहीही आरोप केले, काहीही म्हटले तरीही मी त्यांच्याबाबत काही बोलणार नाही. त्यांना बोलायचा हक्क आहे. अजित पवार जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांनी शरद पवारांबाबत काय काय म्हटलं नाही? तुम्हीच बघा. शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली कारण हे दोन्ही पक्ष आतून आधीच तुटलेले होते. दोन्ही पक्ष फुटले म्हणून मला फायदा होईल असं मला वाटत नाहीये, मी काय त्या आशेने निवडणुकीत उतरलेलो नाही. असंही राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले.
२०१९ ला मतदारांच्या मतांचा अपमान झाला
२०१९ ला जी निवडणूक पार पडली त्यानंतर जे निकाल लागले त्यात कौल भाजप आणि शिवसेनेला मिळाला होता. त्या जनमताचा अपमान झाला. आज महाराष्ट्राच्या मतदारांना हे ठाऊकही नाही की मी जे मत दिलं तो नेता कुठल्या पक्षात आहे? अशा प्रकारची परिस्थिती मी आजवर पाहिलेली नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटले मग भाजपा किंवा काँग्रेस हे पक्ष का फुटले नाही? २०१९ ला निकाल आल्यानंतर आपण काय पाहिलं पहाटेचा शपथविधी झाला. आपल्याला आश्चर्य वाटलं की जे विरोधात लढले ते एकत्र कसे? त्यानंतर युतीतला एक पक्ष बाहेर पडतो मुख्यमंत्री व्हायचं म्हणून दोन विरोधी पक्षांबरोबर जातो. मतदारांना हेच कळत नाही आपण कुणाला मत दिलं? असंही राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) हे वक्तव्य केलं.