साहित्यकार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज ( १५ नोव्हेंबर ) पहिला स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी समाज माध्यमात पोस्ट केली आहे. बाबासाहेब आयुष्याची १०० वर्ष एकच ध्यास घेऊन जगले, तो ध्यास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, असे म्हणत राज ठाकरेंनी आठवणींना उजाळा दिला आहे.
ट्विट करत राज ठाकरे म्हणाले की, “बाबासाहेबांच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ऐकताना त्यातली उत्कटता मनाला भिडायची, जसं लतादीदींचं गाणे आर्त वाटतं तशीच ही अनुभूती असायची. ही उत्कटता, आर्तता ही एका जन्मात येऊ शकत नाही. बाबासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांवरची भक्ती ही अनेक जन्मांची असणार. ही श्रद्धाच त्यांच्या आयुष्याची ताकद ठरली.”
“छत्रपती शिवाजी महाराज हा विचार घराघरात पोहचवणं हेच जगणं मानणाऱ्या बाबासाहेबांना हयातीतच नको तो मनस्ताप झेलावा लागला, पण त्यावर त्यांनी अवाक्षर काढलं नाही. आज बाबासाहेब आपल्यात नाहीत. ‘ह्या सम होणे नाही’, असं आपण सहजपणे म्हणतो, खरंच बाबासाहेब पुरंदरेसारखा ‘शिव’भक्त होणे नाही. पण त्याच वेळेला असं देखील वाटतं माझ्या पिढीचं ठीक आहे, पण पुढच्या पिढ्यांना अस्सल आणि उत्तुंग व्यक्तिमत्व कशी बघायला मिळणार?”, असेही राज ठाकरेंनी म्हटलं.
हेही वाचा : ठाकरे गटाची याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्हाला गुंतवून…!”
“असो काळ हेच त्यावरचं उत्तर आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या स्मृतीदिनी, त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन,” अशी आदरांजली राज ठाकरेंनी वाहिली आहे.