एकनाथ खडसे यांच्याशी आपले व्यक्तिगत भांडण नाही. परंतु विधानसभेत टोलचा विषय मांडण्यासंदर्भात त्यांच्याशी आपले बोलणे झाले. बाळा नांदगावकरही त्यांच्याशी बोलले. त्यानंतरही टोलचा विषय विधानसभेत आलाच नाही. मग विरोधी पक्ष फक्त चहापानासाठीच आहे काय, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी अनौपचारिक बातचीत करताना केला. रविवारी येथे ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून या सभेत त्यांचे लक्ष्य खडसे हेही राहणार हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
खडसे काय किंवा अजित पवार काय, दोघांशीही आपले भांडण नाही. परंतु आपण कोणाशीही सेटलमेंट करीत नाही आणि करणार नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. ठाकरे यांची जळगावात पहिलीच सभा असल्याने त्याविषयी जिल्ह्य़ात प्रचंड उत्सुकता आहे. ठाकरे या सभेत खडसेंविरोधात बोलतील का, हे जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी त्यांना छेडले असता ठाकरे यांनी स्पष्टपणे कोणतेही विधान केले नसले तरी टोलचा विषय मांडत आणि खडसे यांच्या बोलण्याची नक्कल करीत त्यांनी खडसे यांच्याविषयीचा रोष जराही कमी झालेला नसल्याचे दाखवून दिले.

Story img Loader