Raj Thackeray and Vicky Kaushal Read Marathi Poem: बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने ‘छावा’ चित्रपटात साकारलेली छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका चांगलीच गाजत असून चित्रपटाला उत्तरोत्तर प्रसिद्धी मिळत आहे. या भूमिकेमुळे विकी कौशलचे कौतुक होत आहे. आता आणखी एक कौतुकास्पद असा क्षण मराठीजनांना अनुभवायला मिळणार आहे. अभिनेता विकी कौशल, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, प्रख्यात लेखक जावेद अख्तर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सोनाली बेंद्रे, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आणि इतर मान्यवर शिवाजी पार्कवर येत्या मराठी भाषा दिनानिमित्त मराठी कविता वाचन करणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
याशिवाय याशिवाय दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री शर्वरी वाघ, अभिजात जोशी, नागराज मंजुळे, विजय दर्डा, भरत दाभोळकर, पराग करंदीकर, राजीव खांडेकर, महेश मांजरेकर आणि लक्ष्मण उतेकर हेदेखील मराठी कविता वाचण करणार आहेत.
राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण फेसबुक पोस्टद्वारे दिले आहे. “मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवत आहे. हे पुस्तक प्रदर्शन चार दिवस म्हणजे २ मार्च २०२५ पर्यंत असेल. महाराष्ट्रातील सर्व नामांकित प्रकाशक या प्रदर्शनात त्यांची पुस्तके घेऊन येत आहेत. मराठी साहित्याचे दर्शन घडवणारे हे सगळ्यात मोठे पुस्तक प्रदर्शन असेल याची मला खात्री आहे”, असे राज ठाकरे यांनी लिहिले आहे.
राज ठाकरे यांनी पुढे लिहिले, “या प्रदर्शनाचं औपचारिक उदघाट्न झाल्यावर काही मान्यवरांना बोलावून त्यांच्या आवडीची एक कविता त्यांनी म्हणावी असा विचार डोक्यात आला, आणि जवळपास १७ मान्यवरांशी मी बोललो आणि प्रत्येकाने आनंदाने या कल्पनेला होकार दिला. इतक्या मान्यवरांच्या मुखातून मराठी कविता ऐकणे हा एक अनुभव असेल तो प्रत्यक्ष अनुभवायला याच.”
दोन मराठी माणसे सर्रास हिंदी बोलतात…
“या भाषेत किती अफाट साहित्य आणि त्यातून विचार निर्माण झाला आहे हे पुढच्या पिढयांना कळायलाच हवे. आणि हे का करावे लागेल तर आजकाल दोन मराठी माणसे सुद्धा सर्रास एकमेकांशी हिंदी किंवा इंग्रजीत बोलतात. असे का होतेय हे कळत नाही… मराठी उत्तम साहित्याची भाषा होतीच आणि ती परंपरा सुरु आहे ,पण मराठी ही आता ज्ञानची भाषा देखील व्हायला लागली आहे. जगभरातील अनेक उत्तमोत्तम पुस्तके मराठीत येत आहेत, ज्यातून बदलत्या जगाचे भान येणे सहज शक्य आहे. हे आत्ताच पुढच्या पिढ्यांच्या मनात रुजवावे लागेल. आणि हे जर घडले तर अजून ताकदीने लेखक, विचारवंत या भूमीत निर्माण होतील”, असेही राज ठाकरे म्हणाले.