राज्यात जून २०२२ रोजी अभूतपूर्व राजकीय घटना घडली. महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी फूट पाडून भाजपासोबत हातमिळवणी केली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करता न आल्याने महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि परिणामी शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आलं. तेव्हापासून राज्यात अनेक घटना घडल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडाला एक वर्ष पूर्ण होत नाही, तोवर राष्ट्रवादीतही तशी फूट पडली. यामुळे विरोधी बाकावर असलेले अजित पवार थेट उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत सामील झाले. त्यामुळे, जो पक्ष सत्तेत आहे, तोच पक्ष विरोधातही आहे असं विचित्र चित्र निर्माण झालं आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“महाराष्ट्रात सगळी विचित्र आणि घाणेरडी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती मी महाराष्ट्रात कधीच पाहिली नाही. जगाच्या पाठीवर महाराष्ट्र एकमेव राज्य असेल जिथं दोन पक्ष सत्तेत आणि विरोधातही आहेत. एकाच नावाने अर्धा पक्ष सत्तेत आहे आणि अर्धा पक्ष बाहेर आहे”, असं राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> “मी ससूनमधून पळालो नाही, मला…”, ललित पाटीलचा गंभीर आरोप; रोख नेमका कोणावर?

“सत्तेत कोण आहे? शिवसेना. विरोधी पक्षात कोण आहे? शिवसेना. सत्तेत कोण आहे? राष्ट्रवादी. बाहेर कोण आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. अशी परिस्थिती कधी जगात पाहिली आहे का? हे काय राज्य म्हणायचं का? नुसतं आपलं चालू आहे. दिवस ढकलत आहेत”, असा घणाघातही राज ठाकरेंनी केली.

“तुम्ही मेलात तरी चालेल”

“परवा कोकणात ब्रिज पडला, मी परवाच बोललो की प्रत्येक ब्रिजचं दरवर्षी स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे. पण कोणाला काहीच पडलेली नाही. तुम्ही जगा किंवा मरा. फक्त मतदानादिवशी मतदान करा. आणि मग तिथेच मेलात तरी चालेल. काय पण ब्रिज आणि फ्लायओव्हर बांधतात. लोकांची चिंताच नाही कोणाला”, असंही ते म्हणाले.

हेही वाचा >> “मोदी-शाह-शिंदेंना वेळ नसेल, तर…”; मराठा आरक्षणावर मनोज जरांगे आक्रमक, स्पष्टच म्हणाले…

“किशोर रुपचंदानीच्या इगल कंस्ट्रक्शनला १४० कोटींचा फ्लायओव्हर बांधायला दिला. तो पडला. एक दिवसाची बातमी होते, त्यानंतर पुढे काही बोललं जात नाही. संबंधित मंत्र्याचा कोणी राजीनामाही मागितला जात नाही. संबंधित मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की गणपतीसाठी एक लेन सुरू करतो. करोडो रुपये फुकट जात आहेत, रस्त्यांवर जीव जात आहेत. पण मतदान सुरू आहे देशात. तेच तेच निवडून येत आहेत. ज्या नागरिकांना राग येत नाही, त्यांचं काय करायचं?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

“परशुराम आरोळी रस्त्याचंही त्यालाच काम दिलंय. मुंबईतील ९८० कोटींचं काम सुरू आहे. ज्यांच्या हातून ब्रिज पडत आहेत, रस्ते चांगले बांधले जात नाहीयत अशा लोकांना हजार, दोन हजार कोटींची कामे दिली जात आहेत. आम्ही फक्त हताशपणे बघत बसायचं”, असं ते म्हणाले.

“कायदा नावाची गोष्टच उरली नाही. भीती नावाची गोष्टच उरली नाही. रस्त्यावर खड्डे पडत आहेत, खड्ड्यांवरून गाड्या जात आहेत, पण राग येत नाही कोणाला. आत जे धुमसत आहेत ते एकदिवस बाहेर काढेन. इंजिनाची वाफ बाहेर काढेन. नाही चटके बसले यांना त्या गोष्टीचे तर पाहा. तुर्तास या निवडणुकांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे”, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray warned to government over bridge collapse and road construction sgk