दिशा सालियन प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी होऊ शकते. कारण सरकारने त्या प्रकरणात एसआयटी स्थापन केली आहे. याबाबत आदित्य ठाकरे असं काही करणार नाहीत असा विश्वास त्यांच्या काकू आणि राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी व्यक्त केला आहे. ज्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचे आभार मानले. याबाबत विचारलं असता उद्धव ठाकरेंना शर्मिला ठाकरेंनी टोला लगावला आहे. आभार मानायची वेळ आम्हाला उद्धव ठाकरेंनी आयुष्यात कधीही दिली नाही असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
“मी आभार मानतो त्यांचे. (शर्मिला ठाकरे) मला याच गोष्टीचा राग आहे की सूतराम संबंध नसताना तुम्ही एसआयटी लावत आहात. आमच्याकडे पुरावे असता एसआयटी का लावत नाही?” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी सरकारला केला. तसंच शर्मिला ठाकरेंचे आभार मानले. त्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंवरुन टोला लगावला आहे.
काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे?
“आभार मानण्याची वेळ मला उद्धव ठाकरेंनी आयुष्यात कधीच दिली नाही. किणी प्रकरणापासून आजपर्यंत जेवढ्या वेळेला मिळेल तेव्हा आम्हाला ते चिमटे काढत असतात. निदान जो भाऊ तुमच्या बरोबर लहानपणापासून मोठा झाला त्याच्यावर थोडा तरी विश्वास ठेवला असतात ना तर आम्हाला कधीतरी आभार मानायची वेळ असती. जी आता त्यांच्यावर आली आहे. मी माझ्या पुतण्यावर (आदित्य ठाकरे) विश्वास ठेवला. मी सांगितलं की तो असं काही करेल वाटत नाही. पण तुम्ही ज्या भावाबरोबर मोठे झालात आयुष्यभर त्याला किणी प्रकरणाच्या वेळी का मदत केली नाही? आजपर्यंत कुठलीही वेळ आली की आम्हाला टोमणे मारतात. तुम्ही तुमच्या भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा. मग आम्हीपण आभार मानू.” असं वक्तव्य शर्मिला ठाकरेंनी केलं आहे.
हे पण वाचा- उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला!, “आम्ही अदाणींना प्रश्न विचारला तर चमचे…?”
धारावीचा विकास करायला उद्धव ठाकरेंना कुणी अडवलं होतं?
अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. कोव्हिड काही महिन्यांनी सुरु झाला. धारावीचा विकास सरकारने केला पाहिजे असं तुम्हाला वाटत होतं तर मग तुम्ही तेव्हा निर्णय का घेतला नाहीत? तुम्हाला कुणी अडवलं होतं? चांगले निर्णय घ्यायला तुम्हाला कुणी थांबवलं होतं? आत्ता सगळ्या गोष्टींना कोव्हिडचं कारण देत आहेत. पण कोव्हिड काही महिन्यांनी सुरु झाला त्याआधी चांगला निर्णय घेता आला असता असंही शर्मिला ठाकरेंनी म्हणत टोले लगावले आहेत.