मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे विश्वासू अभिजीत पानसे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी शिवसेनेचं (ठाकरे गटाचं) मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या कार्यालयात आले होते. पानसे हे मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचा प्रस्ताव घेऊन संजय राऊतांना भेटले असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत प्रसारमाध्यमांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याशी बातचित केली. यावेळी देशपांडे यांनी स्पष्ट केलं की, मनसे आणि उबाठा सेनेच्या युतीचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडून देण्यात आलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संदीप देशपांडे म्हणाले, युतीचा कोणाताही प्रस्ताव आमच्याकडून पाठवण्यात आलेला नाही. याआधी आम्ही २०१४ आणि २०१७ मध्ये उबाठा सेनेला युतीचा प्रस्ताव दिला होता. परंतु तेव्हा उबाठा गटाचा अत्यंत नकारात्मक प्रतिसाद होता. त्यामुळे आत्ता आम्ही प्रस्ताव देण्याचा विषय येत नाही.

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, दोन्ही पक्षांची युती व्हावी यासाठी आमच्याकडून दोन वेळा प्रयत्न झाला आहे. परंतु त्यांच्याकडून असा कोणताही प्रयत्न झाला नाही, ही गोष्ट नमूद करणं गरजेचं आहे. तुम्ही कधी त्या भावाला (उद्धव ठाकरे) विचारलं आहे का? सगळे प्रश्न मनसेलाच का विचारता? कधी त्यांनाही विचारा. आम्ही प्रस्ताव दिला तेव्हा त्यांनी तो का नाकारला? हेही विचारा त्यांना. दररोज सकाळी संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलतात, तेव्हा त्यांना विचारा.

संदीप देशपांडे म्हणाले, तुमची (शिवसेना – ठाकरे गट) वाईट परिस्थिती आली की, मनसेने पुढाकार घ्यायचा का? २०१२ मध्ये आम्ही ठाण्यात शिवसेनेला पाठिंबा दिला होता. परंतु नंतर त्यांनी आमचे नगरसेवक चोरले. या सगळ्या गोष्टी आम्ही कशा विसरणार. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर राज्यात अनेक ठिकाणी झळकले आहेत. त्याबाबत देशपांडे यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, आमचे नगरसेवक चोरले तेव्हा या बॅनर लावणाऱ्यांची काय भावना होती? अमित ठाकरे आजारी होते, तेव्हा आमचे सहा नगरसेवक त्यांनी (शिवसेना) चोरले, तेव्हा या बॅनरवाल्यांची काय भावना होती?

हे ही वाचा >> Video: “…तर आम्ही मागेपुढे पाहणार नाही”, अजित पवारांचं बंड पुन्हा मोडून काढण्याची सोनिया दुहान यांना खात्री; दिलं खुलं आव्हान!

ठाकरे गटाकडून मनसेला युतीचा प्रस्ताव आला तर मनसेची काय भूमिका असेल? असा प्रश्न विचारल्यावर संदीप देशपांडे म्हणाले, या जर-तरच्या गोष्टींना काही महत्त्व नाही. समजा असं झालं आणि त्यांच्याकडून युतीचा प्रस्ताव आला तर अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray will decide on proposal of shivsena thackeray group and mns alliance asc
Show comments