महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पाडवा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातील मनसैनिक कार्यक्रमस्थळी हजर झाले आहेत. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीबाबत घेतलेला निर्णय याची देही याची डोळा ऐकण्यासाठी शिवाजी पार्कात आज तुफान गर्दी होण्याची शक्यता आहे. तसंच, महाराष्ट्रभरातील अनेक राजप्रेमीही त्यांच्या या भूमिकेकडे डोळे लावून बसले आहेत. दरम्यान, राज ठाकरे जी बाजू घेतील ती धर्माचीच असेल, असं मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन म्हणाले आहेत. ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत सहभागी होण्याच्या दृष्टीने ही भेट असल्याचं बोललं जातंय. परंतु, या भेटीबाबत राज ठाकरेंकडून काहीही अधिकृतरित्या सांगण्यात आलेलं नाही. या भेटीत काय घडलं, राजकारणात काय घडतंय हे सगळं आजच्या मेळाव्यात सांगणार असं मेळाव्याच्या टिझरमधून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, राज ठाकरेंनी कोणती भूमिका घ्यावी, असा प्रश्न प्रकाश महाजन यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी अत्यंत बुद्धीचातुर्याने उत्तर दिलं आहे.
हेही वाचा >> मोदींना साथ देण्यासाठी राज ठाकरे यांनी महायुतीसोबत यावे – बावनकुळे
प्रकाश महाजन म्हणाले, २०२४ लोकसभेची निवडणूक धर्मयुद्ध आहे. राज ठाकरे आपल्याबाजूने असावेत असं प्रत्येक गटाला वाटतंय. पण राज ठाकरे धर्माच्या बाजूने जाऊन योग्य निर्णय घेतील, असं वाटतंय.
ही धर्माची बाजू कोणती? असं त्यांना विचारलं असता प्रकाश महाजन म्हणाले, “धर्माची बाजू राज ठाकरे ठरवतील. राज ठाकरे ठरवतील तीच धर्माची बाजू असेल.” प्रकाश महाजन यांच्या या उत्तरामुळे राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, अमित शाहांच्या भेटीत काय ठरलं? असं विचारलं असता ते म्हणाले, “एवढ्या उच्चस्तरावरील चर्चा आमच्यापर्यंत आलेल्या नाहीत. ते फक्त साहेबांपर्यंत आहे. साहेबच ते सांगतील.
राज ठाकरेंनी कोणाच्या बाजूने जावं?
“मी ज्यावेळी राज ठाकरेंबरोबर काम करायचं ठरवलं तेव्हा वैयक्तिक प्रकाश महाजन उरले नाहीत. राज ठाकरे जी बाजू घेतील तीच माझी बाजू असणार. सेनापतीने धोरण आखायचं, सैन्यान लढायचं असतं. कोणाच्या बाजूने लढायचं, विरोधात लढायचं हे त्यांनी सांगितलं की आम्ही करणार”, असंही ते पुढे म्हणाले.