वाघांच्या शिकार प्रकरणातील आरोपींना अटक करणाऱ्या पोलीस पथकाला गेल्या वर्षी मनसेकडून जाहीर करण्यात आलेले पाच लाखाचे बक्षीस लवकरच देण्यात येईल, अशी घोषणा आज राज ठाकरे यांनी येथे केली. विदर्भात पक्षाची संघटनात्मक ताकत चांगली असल्याचा दावा करतानाच त्यांनी नितीन गडकरींशी संबंधित कोणत्याही प्रश्नावर उत्तर देण्यास नकार दिला.
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारपासून येथे आलेले राज ठाकरे यांनी शनिवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे यांना त्यांनी गेल्या वर्षी वाघांच्या शिकारीच्या संदर्भात केलेल्या घोषणांचा विसर पडला आहे, अशा आशयाचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत ठाकरे यांनी शिकार प्रकरणातील आरोपींना अटक करणाऱ्या पोलीस पथकाला पाच लाखाच्या बक्षिसाची रक्कम लवकरच दिली जाईल, अशी माहिती दिली. शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अमरावतीला सभा घेतली म्हणून तेथे सभा आयोजित केली का, असा प्रश्न विचारला असता मनसेतर्फे अमरावतीत सभा घेण्याचे दोन महिन्यापूर्वीच निश्चित झाले होते, असे उत्तर त्यांनी दिले. विदर्भात पक्षाची बांधणी कमकुवत नाही उलट चांगली आहे. संघटनात्मक बांधणीसाठी स्थानिक कार्यकर्ते चांगले काम करत आहेत, असा दावा त्यांनी केला. राज ठाकरे यांनी आज राजकीय विधाने करण्याचे टाळले.
काही दिवसापूर्वी नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली होती. ठाकरे यांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यावर केलेल्या आरोपाच्या पाश्र्वभूमीवर ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती. या पाश्र्वभूमीवर गडकरी यांच्याशी संबंधित प्रश्न विचारले असता ठाकरे यांनी उत्तर देण्यास नकार दिला. ‘नो कॉमेंट’ एवढेच उत्तर आपण आज देऊ शकतो, असे ते म्हणाले.
वर्षांपूर्वीच्या आश्वासनाच्या पूर्ततेचा राज यांचा वायदा
वाघांच्या शिकार प्रकरणातील आरोपींना अटक करणाऱ्या पोलीस पथकाला गेल्या वर्षी मनसेकडून जाहीर करण्यात आलेले पाच लाखाचे बक्षीस लवकरच देण्यात येईल, अशी घोषणा आज राज ठाकरे यांनी येथे केली. विदर्भात पक्षाची संघटनात्मक ताकत चांगली असल्याचा दावा करतानाच त्यांनी नितीन गडकरींशी संबंधित कोणत्याही प्रश्नावर उत्तर देण्यास नकार दिला.
First published on: 17-03-2013 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray will pay 5 lakh rs as a reward to police team over tiger hunting