Devendra Fadnavis on Raj Thackeray Mahayuti Alliance : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपाबरोबर युती करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी एका चॅनेलच्या कार्यक्रमात पुढील मुख्यमंत्री भाजपाचा असून आम्ही महायुतीबरोबर जाण्याचा पर्याय निवडू असं म्हटलंय. यामुळे राज ठाकरेंचा मनसे पक्षही आता महायुतीत सामिल होणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. परंतु, यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. आज नागपुरात गेल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरेंना महायुतीत घेणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज ठाकरे हे आमचे मित्र आहेत. मागच्या निवडणुकीत (लोकसभेला) त्यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिलाय. यावेळी त्यांची भूमिका वेगळी आहे. त्यांनी अनेक जागांवर उमेदवार उभे केले आहेत. ते उमेदवार महायुतींच्या उमेदवारांविरोधात लढणार आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यासोबत रिपाईं, जनसुराज्य आणि इतर लहान पक्ष अशी आमची महायुती आहे. मनसेने इतर वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवार उभे केल्याने ते महायुतीत येतील असा कोणताही स्कोप नाही.”

हेही वाचा >> महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

मनसेला काही जागांवर मदत करू पण…

“मनसे त्यांचा उमेदवार मागे घेणार नाहीत. या निवडणुकीत तरी आम्ही समोरा-समोर लढतोय हे चित्र स्पष्ट आहे. महायुती एकीकडे आहे. तसंच, मनसे वगैरे इतर पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. एखाद-दुसऱ्या जागी मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने मनसेला मदत करण्यासाठी विचारू करू शकतो. शिवडीसारख्या जागेवर मुख्यमंत्र्यांनी एक भूमिका घेतली आहे. पण आता तरी स्पष्टपणे सांगू इच्छितो की महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतर लहान मित्र इतकेच आहोत. महायुतीचं सरकार येईल आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होईल”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री पदाबाबत राज ठाकरे काय म्हणाले होते?

राज ठाकरे म्हणाले, “मला वाटतं, की राज्यात महायुतीचं सरकार येईल आणि पुढचा मुख्यमंत्री भाजपाचा होईल. जेव्हा २०२९ मध्ये तुम्ही मला हा प्रश्न विचाराल, तेव्हा मी सांगेन की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्यमंत्री होईल. माझी ही गोष्ट आपण लिहून ठेवा.” पुढे बोलताना, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? असं विचारलं असता,“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं वाटतं, ते नक्कीच मुख्यमंत्री होऊ शकतात” असं त्यांनी सांगितलं.