महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच एक मुलाखत पार पडली. लोकमान्य सेवा संघ पार्लेच्या शतकपूर्ती निमित्त त्यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीतून राज ठाकरे यांनी व्यंगचित्रकार आणि राजकीय नेता म्हणून कशी सुरुवात झाली? याबाबत आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी ‘लोकसत्ता’ वर्तमान पत्रात फ्रीलान्स म्हणून काम करतानाचा अनुभवही सांगितला आहे.
यावेळी राज ठाकरे म्हणाले, “लोकसत्ता वर्तमानपत्रात मी दोन वर्षे फ्रीलान्सर म्हणून काम केलं. आठवड्यातील तीन दिवस पहिल्या पानावर माझी व्यंगचित्र छापली जायची. तेव्हा माधवराव गडकरी हे लोकसत्ताचे संपादक होते. मी ‘एक्स्प्रेस टॉवर’ इमारतीत जाऊन त्यांना व्यंगचित्र देत असे. माधवराव गडकरी यांनी मला एकदा पार्ले येथील एका कार्यक्रमात विचारलं होतं की, लोकसत्तासाठी व्यंगचित्र काढशील का? तेव्हा मी बाळासाहेब ठाकरेंना विचारून सांगतो, असं म्हटलं. त्यानंतर बाळासाहेबांनी होकार दिल्यानंतर मी ‘लोकसत्ता’साठी काम करायला सुरुवात केली.”
एखाद्या वृत्तपत्रासाठी ठाकरे परिवारातील व्यक्ती व्यंगचित्र काढणार ही बाब त्यांच्यासाठी खूप मोठी असेल ना? असं विचारलं असता राज ठाकरे पुढे म्हणाले, “नाही ओ… त्यावेळी कोण कुठचा राज ठाकरे… माझ्यासाठी ‘लोकसत्ता’ खूप मोठा होता. माधवराव गडकरी खूप मोठे होते,” अशी आठवण राज ठाकरेंनी सांगितली.
दरम्यान, राज ठाकरेंनी सध्याच्या राजकीय स्थितीवरही भाष्य केलं. “आताचं महाराष्ट्रातील राजकारण पाहिलं तर मी या राजकारणात योग्य नाही, असं मला वाटतं. महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती खूप गलिच्छ आहे. आतापर्यंत मी महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीही पाहिली नाही. याला सोशल मीडिया कारणीभूत आहे, असं मला वाटतं. कारण कुणीही व्यक्त व्हायला लागलंय. त्यांच्या व्यक्त होण्याला पैसे लावले पाहिजे, तरच ते गप्प होतील. कुणी काहीही बोलतंय. हे सगळं टीव्हीवर दाखवलं जातंय. मी यावर अनेकदा बोललो आहे,” असं राज ठाकरे म्हणाले.
“मला आता या सगळ्या गोष्टींचा वीट यायला लागला आहे. येथे अनेक लोकांनी अनेक वर्षे महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं आहे, पण असा महाराष्ट्र कधी कुणी पाहिला नाही. ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं, त्या महाराष्ट्राचं प्रबोधन करायची वेळ आली आहे,” असंही राज ठाकरे पुढे म्हणाले.