महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे मनसे कार्यकर्त्यांकडून २००८मध्ये औरंगाबादमध्ये एसटीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे राज यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, हा गुन्हा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून सोमवारी रद्द करण्यात आला. त्यामुळे राज ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

२००८ मध्ये राज ठाकरे यांच्या अटकेचे आदेश निघाले होते. त्या वेळी हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा, मग बघा काय होते ते, असे प्रक्षोभक विधान ठाकरे यांनी केले होते. नंतर २१ ऑक्टोबर २००८ रोजी पिशोर ते भारंबा जाणाऱ्या एसटीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह सात जणांविरोधात पिशोर पोलीस ठाण्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व मुंबई कायदा कलम १३२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, या खटल्याची सुनावणी कन्नड न्यायालयात सुरू असताना येथे हजर राहण्यापासून सूट मिळावी यासाठी त्यांनी हजेरी माफीचा पुनर्विलोकन अर्ज १३ एप्रिल २०१८ रोजी कन्नड न्यायालयात दाखल केला होता. त्यावेळी कन्नड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठाकरे यांचा अर्ज फेटाळला होता.

Story img Loader