डीपफेक, ट्रोलिंग, अश्लील मेसेजविरोधातील सामना सध्या प्रचंड वाढला आहे. सेलिब्रिटींपासून सामान्य घरातील मुलींना यातून जावं लागतंय. सोशल मीडियावर वावरताना आंबटशौकिन लोकांपासून सावध राहावं लागतं. सोशल मीडियावरील पोस्ट असो वा इतर कोणत्याही माध्यमावर व्यक्त होणं असो, मुलींना सध्या अधिकची काळजी घ्यावी लागते. याच अडचणीतून राजकीय नेत्यांच्या मुलींनाही जावं लागत असल्याचा धक्कादायक प्रकार आता उजेडात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे हिलाही असंख्य वाईट मेसेज येत असल्याचं नुकतंच शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांसमोर सांगितलं.
अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा डीपफेकचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी केंद्र सरकारने कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही अनेक अभिनेत्रींना या डीपफेकला बळी पडावं लागलं. त्यामुळे आगामी काळात हे तंत्रज्ञान लोकशाहीला धोक्यात आणणारं आहे, असा सूरही अनेक नेत्यांनी आवळला. असं असतानाच राजकीय नेत्यांच्या मुलींनाही यातून जावं लागत आहे. आज राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना या डीपफेकबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना शर्मिल ठाकरेंनी याबाबत चिंता व्यक्त केली.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मीही यातून जातेय. माझ्या मुलीला युट्यूबवर मुलं वाट्टेल तसे मेसेज करत असतात. मी स्वतः पोलीस आयुक्तांना अनंत वेळा तक्रार केली आहे. त्यांनी या प्रकरणी अटकही केली. पण आपला ब्रिटीशकालीन कायदा इतका तकलादू आहे की कितीही अटक केली तरी त्यांना सोडावं लागतं. त्यामुळे कायद्यात बदल केला पाहिजे. विधानसभेने यावर कायदा केला तरच यात बदल घडेल.