Raj Thackeray Reaction on Baba Siddique Death : काँग्रेसमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आली. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वांद्रे येथील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्यावर गोळीबार झाला. रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. अनेक नेत्यांकडून याप्रकरणी प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावरून संताप व्यक्त केला आहे. ते आज जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

“उज्ज्वल परंपरा असलेल्या या प्रदेशात तुम्हाला उद्ध्वस्त करायचं आहे. सर्वांचे महाराष्ट्राकडे डोळे लागले आहेत. कोण येतंय, कोण जातंय कोणाला काही थांगपत्ताच नाही”, असं राज ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले, “काल सिद्दिकी यांचा खून झाला. खून करणारी माणसं कोण? एक युपीचा आणि एक हरियाणाचा. बाहेरच्या राज्यातून लोक येतात, पोलिसांच्या देखत, इतक्या लोकांसमोर खून होत आहेत.” दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.  हरियाणातील कर्नेल सिंग आणि उत्तर प्रदेशातील धर्मराज कश्यप या दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून दोघेही २० वर्षांचे आहेत.

हेही वाचा >> Raj Thackeray : “शरद पवार, तुम्ही काय केलंत आयुष्यभर?”, भरसभेत राज ठाकरेंचा सवाल; फोडाफोडीच्या राजकरणावरून अजित पवारांनाही सुनावलं!

यावेळी त्यांनी महाराष्ट्रात मुलींवर लैंगिक अत्याचाराची आकडेवारीही वाचून दाखवली. “हा समृद्ध महाराष्ट्र? बाईबद्दल काही गोष्ट घडली की तर चौरंग करणारा आमचा शिवराय, ती धाक, भीती होती, ती कुठेय राज्यात? ही जर महिलांची परिस्थिती असेल, लहान मुलींची परिस्थिती असेल तर कोणत्या शाळेत पाठवायचं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हे स्वराज्य आहे का? हे माझं महाराष्ट्र राज्य आहे का? प्रत्येक राज्याला वाटायला लागलं की महाराष्ट्रासारखं आम्हाला प्रगत व्हायचंय, तो महाराष्ट्र असा अधोगतीला जातोय”, असं ते म्हणाले.

…तर महाराष्ट्र बरबाद होत जाणार

सरळ सभ्य प्रामाणिक नेता महाराष्ट्राला का आवडत नाही? गद्दारी करणारा प्रत्येकजण तुम्हाला का आवडतो? आमदार फोडाफोडी करायचे, राजकारण तापवायचं. एका पक्षाबरोबर निवडणूक लढवायची, विचारांची प्रतारणा करून दुसऱ्याबरोबर सत्तेत बसायचं, हेच आपण पाच वर्षे पाहतोय. सरळ विचार करणारा, सभ्य विचार करणारा, प्रगतीचा विचार करणारा माणूस हवा की फोडाफोडीचं राजकारण करणारी असली माणसं पाहिजेत? आज जर महाराष्ट्रातील जनतेने योग्य निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र बरबाद झाला म्हणून समजा. नको त्या विषयांची घाण पसरत जाणार महाराष्ट्रात”, असंही राज ठाकरे म्हणाले.