Raj Thackeray’s Friend Asilata Raje : राज ठाकरेंनी आज सभांचा धडाका लावला आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातील सभा झाल्यानंतर राज ठाकरे ठाण्यात गेले. ठाण्यातील अविनाश जाधव, संदीप पाचंगे यांच्या मतदारसंघांसाठी त्यांनी संयुक्त सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी एका नव्या चेहऱ्याची ओळख करून दिली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची सख्खी नात असिलता सावरकर यांची ओळख करून देत त्या लवकरच पक्षासाठी काम करतील, अशी आशा व्यक्त केली.
राज ठाकरेंनी आज ठाण्यातील सभेत अभिनेते आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उपनेते शरद पोंक्षे आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची नात असिलता राजे यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. त्याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “लग्न झाल्यामुळे आडनाव राजे लागलं. पण ही आमची असिलता सावरकर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची सख्खी नात. ही आणि मी आम्ही शाळेपासून शिशूवर्गापासून दहावीपर्यंत एकत्र वाढलो. आमचं फारसं बोलणं नव्हतं. मी अभ्यासात लोअर कॅटगरीतील होतो. ही भयंकर हुशार होती”, असं राज ठाकरे म्हणाले. “ती मनसेच्या व्यासपीठावर आली. लवकरच पक्षाच्याही कामाला लागेल अशी आशा करतो”, असंही राज ठाकरे मिश्किलेने म्हणाले.
शरद पोंक्षेंबद्दल राज ठाकरे म्हणाले, “शरद पोंक्षेचे आभार मानेन.त्यांनी पक्षांतर न करता या व्यासपीठावर येऊन आम्हाला शुभेच्छा दिल्या. माझ्या सर्व सहकाऱ्यांना निवडून आणण्याकरता आवाहन केलं, याकरता मी आभारी आहे.”
मनसेच्या व्यासपीठावर शरद पोंक्षे
“कुठलीही निवडणूक कोणालातरी हरवण्यासाठी कधीच लढायची नसते, तर जिंकण्यासाठी लढायची असते. कोणाची रेषा पुसून स्वत:ची रेषा मोठी करायची नसते. स्वत:ची रेषा स्वत: काढायची असते. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही पक्षात गेले नाहीत किंवा लगेच घाईघाईने पक्षही काढला नाही. त्यांनी खूप वेळ घेतला, महाराष्ट्रभर फिरले. शिवसेनेतला त्यांचा अनुभव आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर वावरलेला हा मुलगा खऱ्या अर्थाने पुरोगामी म्हणावे असे त्यांचे हिंदुत्वाचे संस्कार. अशा या मुलाने शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर खूप वेळ घेतला आणि मग स्वत:चा पक्ष स्थापन केला. राज्यात मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणं आणि देशाचा प्रश्न आला तर हिंदुंच्या हक्कासाठी लढणं. त्या विचारसरणीवर मनसेचा जन्म झाला”, असं शरद पोंक्षे यांनी म्हटलं.