भारताची कूटनीती यशस्वी ठरली असून कतारने ज्या आठ माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली होती त्यांची सुटका केली आहे. भारताच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. या सगळ्यांवर हेरगिरीचा आरोप होता. कतारने शिक्षा सुनावल्यानंतर भारताने त्यांना आवाहन केलं, तसंच त्यांच्याविषयीची जी कागदपत्रं होती त्यांची पूर्तताही केली. त्यानंतर या सगळ्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित करण्यात आली. मात्र आता या आठही माजी नौसैनिकांची सुटका करण्यात आली आहे. यापैकी सात जण मायदेशी परतले आहेत. या घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“कतारमध्ये भारतीय नौदलाच्या ८ अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करून फाशीची शिक्षा सुनावली होती. पण भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीने त्या सर्व अधिकाऱ्यांची सुटका झाली, ह्याबद्दल सरकारचं अभिनंदन. आता अशीच मुत्सद्देगिरी कुलभूषण जाधव ह्यांच्याबाबत पण दिसू दे आणि लवकरच भारताच्या भूमीवर त्यांचं आगमन होऊ दे ही इच्छा!”, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
कुलभूषण जाधव यांना ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तान येथून पाकमधील गुप्तचर यंत्रणांनी अटक केली होती. कुलभूषण जाधव कमांडिंग ऑफिसर दर्जाचे नौदलातील अधिकारी आहेत व ते भारतातील रॉ साठी काम करत असल्याचा दावा पाकने केला होता. कुलभूषण जाधव हे पाकमध्ये हेरगिरी करत होते, असा आरोपही पाकने केला होता. इराणमार्गे जाधव यांनी पाकमध्ये प्रवेश केल्याचे पाकचे म्हणणे होते.
हेही वाचा >> कतारने फाशीची शिक्षा सुनावलेल्या आठ माजी नौसैनिकांची सुटका, भारताच्या परराष्ट्र नीतीचं मोठं यश
कुलभूषण जाधव हे मुंबईतील माजी सहायक पोलीस आयुक्त सुधीर जाधव यांचे पूत्र आहेत. ते काही वर्षांपूर्वी पोलीस दलातून निवृत्त झाले होते. कुलभूषण यांचे कुटुंबीय पवई येथील हिरानंदानी भागात राहतात.
कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु, आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून या शिक्षेवर केंद्र सरकारने स्थगिती मिळवली. परंतु, त्यानंतर त्यांच्या सुटकेचा अद्यापही कोणताही मार्ग मोकळा झालेला नाही. त्यामुळे ते पाकिस्तानातल तुरुंगात मरणयातना सहन करत असतील, असा दावा केला जात आहे.