महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांनी ही घोषणा केल्यापासून राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली आहे. विविध नेते मंडळींकडून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. उत्तर प्रदेशमधील भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली आहे. तर मनसेच्या काही नेते मंडळींसह पदाधिकाऱ्यांकडूनही अयोध्या दौऱ्यावरून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांनी कडक शब्दांत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना केली आहे.
“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांसाठी… माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील कुणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये. पक्षाने प्रवक्ते नेमलेले आहेत, ते याबाबत बोलतील. इतर कोणीही याबाबत बोलण्याचा शहाणपणा करू नये.”
तसेच “इतर कोणत्याही विषयात पदाधिकारी अथवा कोणीही बोलू नये. ज्यांना जी जबाबदारी दिली आहे, त्यांनीही जबाबदारीने बोलावे, तसेच भाषेचे भान राखावे. जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे. जय महाराष्ट्र!” असं म्हणत राज ठाकरे यांनी सर्वच मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कडक सूचना दिली आहे.